संभाव्य दरडग्रस्त १७ गावांवर नजर!

चिपळूणमधील धोकादायक भागातील नागरिकांच्या स्थलांतरासाठी नोटीस प्रक्रिया सुरू

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यात यंदाच्या मान्सून काळात कोणतीही जीवित हानी टाळण्यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या निर्देशानुसार तालुक्यातील १७ संभाव्य दरडग्रस्त गावांची यादी निश्चित करण्यात आली असून, प्रत्येक गावासाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याच्यादृष्टीने नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने प्रशासनाने मान्सूनपूर्व सज्जतेला वेग दिला आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनूज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मान्सून आढावा बैठकीत विविध विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार बंद पडलेल्या व सोडून दिलेल्या खाणी, नद्या, तलाव तसेच पर्यटनस्थळांवरील खोल पाण्याच्या भागांपासून नागरिक व पर्यटकांनी दूर राहवे, यासाठी महसूल व ग्रामपंचायत यंत्रणेमार्फत जनजागृती सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय वन अधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व तयारी व पुनर्वसन आढावा बैठक पार पडली. या बैठकीत संभाव्य दरडग्रस्त गावांची यादी निश्चित करण्यात आली. पेढे येथील कोष्टेवाडी व बौद्धवाडी, परशुराम घाटातील दुर्गवाडी व ब्राह्मणवाडी, तिवरे येथील गावठाणवाडी, कातकरवाडी, भेंद-फणसवाडी, भेंद-धनगरवाडी, कुंभारवाडी व गंगेचीवाडी, रिक्टोली येथील इंदापूरवाडी, मावळतवाडी, गावठाणवाडी, मधलीवाडी, बौद्धवाडी व देऊळवाडी, तिवडी येथील राळेवाडी, उगवतवाडी व भटवाडी, नांदिवसे येथील राधानगर, स्वयंदेव, वाकरी धनगरवाडी व बावलाई धनगरवाडी, कादवड येथील धनगरवाडी, ओवळी येथील काळकाई धनगरवाडी, धामणदिवाडी धनगरवाडी, बुरंबवणेवाडी व खंड धनगरवाडी, कळकवणे येथील रिंगी धनगरवाडी, खलिफा धनगरवाडी व ऐनाडवाडी, पिंपळी बुद्रुक, कोळकेवाडी येथील खारवार धनगरवाडी, हसरेवाडी, जांभराई धनगरवाडी, कोळवणे धनगरवाडी, माच धनगरवाडी व बोलाडवाडी, कुंभार्ली लांबेवाडी, पेढांबे येथील दाभाडी व रिंगी धनगरवाडी, येगाव येथील ठोकबांव सुतारवाडी, कळंबट येथील घवाळवाडी तसेच गोवळकोट येथील बौद्धवाडी व मोहल्ला आणि पाचाड येथील बुरुडवाडीचा संभाव्य दरडग्रस्त क्षेत्रांमध्ये समावेश करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.

प्रत्येक गावासाठी नोडल अधिकारी
या भागांमध्ये मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन प्रत्येक गावासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच विशेष जनजागृती पथके कार्यरत करण्यात आली असून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहेत. धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्यासाठी नोटिसा देण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे.