दोडामार्ग प्रतिनिधी
येथील म्हावळणकरवाडी येथे वास्तव्यास असलेल्या एका ४३ वर्षीय मजुराचा रविवारी सकाळी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रघुनाथ दिगंबर खिलारी (वय ४३, सध्या रा. म्हावळणकरवाडी – दोडामार्ग, मूळ रा. शेनवडी, ता. मान, जि. सातारा) असे मृत मजुराचे नाव आहे. याप्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.
मूळचे सातारा जिल्ह्यातील असलेले रघुनाथ खिलारी हे दोडामार्ग येथे मजुरीचे काम करत होते आणि येथील शेतमांगर परिसरात राहत होते. रविवारी सकाळी ते नेहमीच्या वेळेपेक्षा उशिरापर्यंत झोपून राहिल्याचे आजूबाजूच्या लोकांच्या निदर्शनास आले. त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल दिसून आली नाही.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांना तातडीने उपचारासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
या घटनेबाबत शेखर विष्णू फाटक (रा. धाटवाडी – दोडामार्ग) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सावंत करत आहेत. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही











