दोन ब्राँझ पदकांची कमाई : अभिनंदनाचा वर्षाव
वेंगुर्ले : दाजी नाईक
महाराष्ट्र रायफल असोसिएशन तर्फे नवी मुंबई येथे ४ जून ते ६ जून या कालावधीत २० वी कॅडेटन चॅम्प. ने. शूटिंग स्पर्धा महाराष्ट्र राज्य नेमबाज अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आली. यांत वेंगुर्ला येथील कु. गौरव आजगावकर यांनी उज्ज्वल यश संपादन करून दोन ब्राँझ पदकांची कमाई केली. या चांगल्या कामगिरीमुळे त्याच्यावर सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील नेमबाज सहभागी झाले होते. कु. गौरव आजगावकर याने ५० मीटर .२२ पीप साईट रायफल स्पर्धेमध्ये प्रोन या प्रकारात दमदार कामगिरी करत राज्यात तिसरी रँक प्राप्त केली. ज्युनियर मेन व युथ मेन मध्ये ६०० पैकी ५६१ गुण मिळवत दोन ब्राँझ पदकांची कमाई केली. त्यांना रत्नागिरी येथील प्रशिक्षक मा. श्री. पुष्कराज इंगवले व राजश्री इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व नॅशनल रायफल असोसिएशनचे खजिनदार विक्रम भांगले सर, प्रशिक्षक कांचन उपरकर सर तसेच सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन चे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.











