चिपळूण शहरात १० पूर, ५ दरडप्रवण क्षेत्रे

चिपळूण न.प.चा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार
 प्रशासन सज्ज; ११ बोटींसह यंत्रणा तैनात
चिपळूण (प्रतिनिधी) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने आपला आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असून त्यात शहरातील १० ठिकाणे पूर व ५ ठिकाणे दरड प्रभावित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. आपत्ती आल्यास प्रशासन सज्ज असून ११ बोटींसह मोठी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. नागरिकांना सतर्क करण्यासाठी १० ठिकाणी पब्लिक अॅड्रेस ” सिस्टीम असून ४ ठिकाणी भोंगे वाजणार आहेत. पूर आल्यास ५ ठिकाणी निवारा, कतर ४ ठिकाणी वाहने पार्किंगची व्यवस्था आहे. कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन रजा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांनी मुख्यालय न सोडण्याबाबतचे आदेश मुख्याधिकारी संजय जाधव यांनी दिले आहेत.
चिपळुणात २०२१ साली आलेल्या महापुरात शहराची मोठी हानी झाली. त्यावेळी अनेक त्रुटी दिसून आल्या. तेव्हापासून प्रशासन दरवर्षी पावसाळ्याच्या काही दिवस अगोदरच सज्ज होत आहे. यातूनच मुख्याधिकारी श्री. जाधव यांनी अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. आराखड्यानुसार शहरातील बाजारपेठ भाग, पेठमाप, गोवळकोट, मुरादपूर, शंकरवाडी, मार्कंडी, चिंचनाका परिसर, वडनाका परिसर, बसस्थानक, पागमळा भाग पूर, तर खेंड, कांगणेवाडी, ओझरवाडी, मतेवाडी, गोवळकोट हे भाग दरडग्रस्त म्हणून ठरवण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारची आपत्ती आल्यास मुख्याधिकारी जाधव, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, मंगेश पेढांबकर, कार्यालय अधिक्षक रोहित खाडे आदींच्या मार्गदर्शनाखाली ९ पथके तयार करण्यात आली आहेत.
आपत्तीबाबत नागरिकांना वेळीच पूर्वसूचना मिळाव्यात यासाठी शहरातील कृष्णाजी कॉम्प्लेक्स चिंचनाका, बाजारपेठ गांधी चौक, कमलकुंज बिल्डींग पेठमाप, गोवळकोटरोड सॉ मिल शेजारी, गोवळकोटरोड कमानी, उक्ताड गणपती मंदिर गोरीवले इमारत, अलिना अपार्टमेंट भेंडीनाका, मनोहर आर्केड बुरुमतळी, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, पूर्व विभाग सोसायटी काविळतळी अशा १० ठिकाणी पब्लिक अॅड्रेस सिस्टीम बसवण्यात आली असून गोवळकोट किल्ला पाण्याची टाकी, पेठमाप समाजमंदिर, शंकरवाडी येथील समाजमंदिर, लोकमान्य टिळक वाचनालय येथे लावण्यात आलेले भोंगे वाजवले जाणार आहेत. शहरात पूर आल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी पूर क्षेत्राबाहेर ५ ठिकाणी निवारा केंद्र सज्ज करण्यात आली आहेत. यामध्ये सह्यादी शिक्षण संस्था, डीबीजे महाविद्यालय, ओझरवाडी मराठी शाळा, कै. बाळासाहेब माटे सभागृह, पाटीदार भवन कापसाळ यांचा समावेश असून यात सुमारे १ हजार ४५० नागरिक राहतील अशी व्यवस्था आहे. तर पूर आल्यास वाहनांचे नुकसान टाळण्यासाठी गोवळकोट जलशुद्धीकरण केंद्र, आनंदराव पवार कनिष्ठ महाविद्यालय खेंड, डीबीजे कॉलेज मैदान, खेंड-गुहागर बायपास रस्ता येथे पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे.
नोडल अधिकाऱ्यांकडे सॅटेलाईट फोन
नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये अनेकवेळा मोबाईल यंत्रणा ठप्प होते. त्यामुळे संपर्क करताना अनेक अडचणी येतात. यामुळे नगर परिषदेने नवीन सॅटेलाईट फोन खरेदी करून तो नोडल अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला आहे. आपत्तीच्यावेळी हा फोन महत्वाचा ठरणार आहे. कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द, मुख्यालय न सोडण्याचे आदेश न.प. कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून येथे नियुक्त कर्मचारी लहान-मोठ्या सर्व घटनांच्या नोंदी ठेवणार आहे. तसेच ३० सप्टेंबरपर्यंत रात्रपाळीही राहणार आहे या मुदतीत दीर्घ रजा व मुख्यालय सोडण्यात येऊ नये असे आदेश मुख्याधिकारी जाधव यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
अशी आहे यंत्रणा
आपत्तीचा सामना करण्यासाठी नगर परिषदेकडे ६ इंजिन बोटी, ५ साध्या बोटी, १२२ लाईफ जॅकेट, १०१ बोये, १२ वल्ले, ३४ रस्सीबंडल, १८ रबरी ट्यूब, १० करवत, ११ कोयत्या, १२ पारई, १० कटावणी, ३ घन, ६० घमेली, ८० फावडी, ७० लोखंडी काटे, ११ हातोडी, १२ शिट्टी, १५ चार्जिंग बटऱ्या, ५ इलेक्ट्रानिक सायरन, ७ मेगाफोन, १ रेसक्यु वॅन, १० हॅण्ड लेड टॉर्च, १ स्ट्रेचर, ५ प्रथोमपचार पेट्या, १५ वॉकी-टॉकी सेट, १ सॅटेलाईट फोन अशी मोठी यंत्रणा सज्ज आहे.
चौकट-
आरोग्य विभाग अधिक सतर्क
शहरात साथीचे आजार पसरू नयेत म्हणून मुख्याधिकारी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, विनायक सावंत, प्रवीण जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते यांनी हा विभाग अधिक सतर्क ठेवला आहे. लागणारी जंतनाशके, औषधांची खरेदी केली जात आहे. तसेच पाण्यातून कोणतेही आजार पसरू नये म्हणून पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख खाडे यांनी हा विभागही सज्ज केला आहे. आरोग्य कर्मचारी पत्रके वाटून पावसाळयात कोणती काळजी घ्यावी याची जनजागृती करणार आहेत. उद्यान विभागाचे प्रमुख प्रसाद साडविलकर हे शहरातील धोकादायक झाडे व फांद्या तोडण्याचे काम करून घेत आहेत, हे कामही आता अंतिम टप्यात आले आहे.
चौकट-
पोहणाऱ्या ७३ तरुणांची घेणार मदत
शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नगर परिषद ७३ पोहणाऱ्या तरुणांची मदत घेणार आहे. त्यांची यादी आपत्तीनिवारण आराखड्यात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनेक सामाजिक संस्थाही आपत्ती काळात मदतीसाठी येणार आहेत.