नवी मुंबई,: नवी मुंबईतील खारघर सेक्टर 34-B परिसरातील तुलिप को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये लिफ्टमध्ये अडकलेल्या चार तरुणांची खारघर अग्निशमन दलाने थरारक आणि सुरक्षित सुटका केली. वीजपुरवठा खंडित झाल्याने लिफ्ट चौथ्या मजल्यावर अडकली होती. सुमारे दीड तास चारही जण लिफ्टमध्ये अडकून पडले होते.
खारघरमधील तुलिप को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे लिफ्ट चौथ्या मजल्यावर बंद पडली. यामध्ये दोन मुली आणि दोन मुले असे एकूण चार तरुण अडकले होते. या सर्वांचे वय अंदाजे २० ते २१ वर्षे असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन केंद्र, खारघर येथील अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बचावकार्य सुरू केले.अग्निशमन दलाने त्यांच्या विशेष रेस्क्यू उपकरणांमधील कटवणी आणि स्प्रेडरच्या सहाय्याने लिफ्टचा दरवाजा उघडला. अत्यंत सावधगिरीने आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने लिफ्टमध्ये अडकलेल्या चारही तरुणांची सुरक्षित सुटका करण्यात आली.
सुटका झाल्यानंतर संबंधित तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सुमारे एक ते दीड तास लिफ्टमध्ये अडकून पडले होते. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळला.












