मृगाची चाहूल, काजव्यांची चकमक आणि निसर्गाची हरवती भाषा

पावसाच्या प्रतीक्षेत निसर्ग, बळीराजा आणि हरवत चाललेल्या निसर्गखुणांची एक भावकथा
धनंजय मराठे

राजापूर:

ज्येष्ठ महिन्याच्या अखेरीस धरती तापलेली असते.शेतातील मातीला भेगा पडलेल्या असतात. विहिरींची पातळी खालावलेली असते. झाडांची पाने धुळीने माखलेली असतात.जनावरे,पक्षी,वन्यजीव आणि माणूस – सगळ्यांनाच पावसाची प्रतीक्षा लागलेली असते. बळीराजाचे डोळे मात्र आकाशाकडे लागलेले असतात.कधी एकदा मृग नक्षत्र लागते आणि पावसाची पहिली सर कोसळते याची तो आतुरतेने वाट पाहत असतो.
अशा वेळी निसर्गही शांत बसलेला नसतो.तो आपल्याशी बोलत असतो.फक्त त्याची भाषा समजून घेण्याची गरज असते.
रानावनात पावश्याची साद घुमू लागते. “पावश्या… पावश्या…” अशी त्याची आर्त हाक कानावर पडते.चातकाच्या प्रतीक्षेच्या कथा पुन्हा जाग्या होतात.आकाशाकडे चोच उंचावून मेघांच्या आगमनाची वाट पाहणारा चातक हा भारतीय लोकमानसात आशा,प्रतीक्षा आणि विश्वास यांचे प्रतीक बनून राहिला आहे. याच दिवसांत नवरंगाचेही दर्शन घडू लागते.त्याच्या रंगीबेरंगी पंखांमध्ये जणू निसर्गानेच पावसाळ्याचे स्वागत रंगवलेले असते.
कोकणातील ज्येष्ठ मच्छीमार आणि ग्रामस्थ अजूनही सांगतात की मृग जवळ आला की दर्याची गाज बदलते.समुद्राचा आवाज गंभीर होतो.वाऱ्याचा स्वभाव बदलतो. ढगांची रचना बदलते. निसर्ग जणू एखाद्या मोठ्या सोहळ्याच्या तयारीला लागतो.
आणि मग एक दिवस…
ओल्या मातीतून बाहेर येतो एक लालभडक, मखमली जीव.
मृग किडा!
ग्रामीण भागात दिसणारा मृग किडा हा केवळ एक छोटासा जीव नाही. तो पावसाची चाहूल आहे. जमिनीतील ओलाव्याची खूण आहे. नव्या कृषी हंगामाची नांदी आहे. अनेक गावांमध्ये ज्येष्ठ मंडळी सांगतात की मृग किडा दिसला की पाऊस जवळ आला हो! काही ठिकाणी त्याला बळीराजाचा पाहुणा,तर काही ठिकाणी पावसाचा दूत असेही संबोधले जाते. वैज्ञानिक भाषेत Red Velvet Mite म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्या अंगावरील लाल मखमली आवरणामुळे तो सहज नजरेत भरतो. काळ्या मातीवरून संथपणे चालणारा हा जीव पाहताना निसर्गाने लाल रंगाचा एखादा जिवंत माणिकच जमिनीवर ठेवला आहे असे वाटते.
परंतु मृग किडा केवळ सौंदर्याचा विषय नाही. निसर्गाच्या विशाल चक्रातील तो एक महत्त्वाचा घटक आहे. मातीतील सूक्ष्म जीवसृष्टीचा तो एक भाग आहे. परिसंस्थेतील संतुलन राखण्यात त्याचे योगदान आहे. म्हणूनच त्याचे अस्तित्व म्हणजे निरोगी माती,समृद्ध जैवविविधता आणि सुदृढ पर्यावरणाचे प्रतीक आहे.
लहानपणी पावसाळ्याच्या दिवसांत निसर्गातील अनेक गोष्टी सहज अनुभवायला मिळायच्या. पाऊस सुरू झाला की बेडकांचे स्वर आसमंत भरून टाकायचे. आपल्या परंपरेत तर या स्वरांना विशेष स्थान आहे. ऋग्वेदातील “मण्डूक सूक्त” बेडकांच्या सामूहिक स्वरगायनाचीच आठवण करून देते. शेतातील माती उलटली की गांडुळांचे अस्तित्व जाणवायचे. आजही अनेक भागांत बेडूक आणि गांडुळे आपले अस्तित्व टिकवून आहेत. ते दिसले की निसर्ग अजूनही श्वास घेत आहे असे वाटतं.

पण काही गोष्टी मात्र आता पूर्वीसारख्या सहज दिसत नाहीत ही खंत आहे.
काजवा हा निसर्गातील एक अद्भुत चमत्कार आहे. स्वतःच्या शरीरातून प्रकाश निर्माण करणाऱ्या मोजक्या जीवांपैकी तो एक. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांत संध्याकाळ होताच झुडपांमध्ये, झाडांच्या फांद्यांवर आणि शेतांच्या कडेला असंख्य काजवे लुकलुकू लागायचे.जणू आकाशातील तारेच पृथ्वीवर उतरले आहेत असे दृश्य निर्माण व्हायचे. ग्रामीण भागातील अनेकांच्या बालपणातील ती एक अविस्मरणीय आठवण आहे.
काजवा आणि मृग किडा या दोघांमध्ये एक विलक्षण साम्य आहे. दोघेही ऋतूचे दूत आहेत. काजवा अंधारात प्रकाशाची छोटीशी ज्योत पेटवतो, तर मृग किडा ओल्या मातीत लाल मखमली आशेचा ठिपका बनून फिरतो. एक आकाशातील तारकांची आठवण करून देतो, तर दुसरा धरतीच्या कुशीत दडलेल्या जीवसृष्टीचे वैभव दाखवतो. एक प्रकाशाची भाषा बोलतो, तर दुसरा रंगांची. पण दोघांचाही संदेश एकच असतो — निसर्ग अजून जिवंत आहे.
पण आज परिस्थिती बदलत चालली आहे.
पूर्वी शिवारात,माळरानावर, पायवाटांवर आणि बागांमध्ये सहज दिसणारे मृग किडे आता क्वचितच दिसतात. काजव्यांचीही तीच अवस्था झाली आहे. पूर्वी अंधार पडताच चमचमणारे थवे दिसायचे; आज त्यांच्यासाठी विशेष ठिकाण शोधावे लागते. निसर्गातील या शांत बदलाची नोंद फारशी कुठे घेतली जात नाही, पण संवेदनशील मनाला ती स्पष्ट जाणवते.
यावर्षी मी मृग नक्षत्र लागल्या पासून शोधत असताना मला मृग किडे दिसल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या मागोमाग मी जवळपास पंधरा किलोमीटरचा प्रवास केला. एका गावात जाऊन त्या लाल मखमली जीवांना पाहिले. त्यांचे छायाचित्रण केले. व्हिडिओ चित्रित केले. कॅमेऱ्याच्या व्ह्यूफाइंडरमधून त्यांच्याकडे पाहताना मनात एक वेगळीच भावना दाटून आली.
एकीकडे आनंद होता — अजूनही निसर्गात हे जीव अस्तित्व टिकवून आहेत याचा.
आणि दुसरीकडे काळजी होती — पुढील पिढीला हे जीव प्रत्यक्ष पाहायला मिळतील का?
कदाचित भावीपिढीला छायाचित्रे आणि व्हिडिओच दाखवावी लागतील.”आमच्या काळी मृग नक्षत्र लागले की असे लाल मखमली मृग किडे दिसायचे… पावसाळी रात्री काजव्यांनी रान उजळून निघायचे…” असे सांगण्याची वेळ आली तर?
आज हवामान बदलत आहे. पावसाचे चक्र अनियमित होत आहे. रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वाढता वापर, जंगलांना लावले जाणारे वणवे, नैसर्गिक अधिवासांचा नाश, वाढते शहरीकरण आणि निसर्गातील वाढता मानवी हस्तक्षेप यांचा परिणाम अशा असंख्य सूक्ष्म जीवांवर होत आहे.
चातकाची आस,पावश्याची साद, नवरंगाचे रंग, दर्याची गाज,काजव्यांची लुकलुक आणि मृग किड्याचे लाल मखमली अस्तित्व — या साऱ्या गोष्टी आपल्या निसर्गसंस्कृतीचा भाग आहेत. त्या केवळ जीवशास्त्राचा विषय नाहीत; त्या आपल्या लोकजीवनाच्या, शेतीच्या, ऋतूचक्राच्या आणि सामूहिक स्मृतींच्या जिवंत खुणा आहेत.
मृग किड्याकडे पाहताना मला केवळ एक जीव दिसत नाही. दिसतो तो निसर्गाचा एक जुना संदेशवाहक. बळीराजाला आशा देणारा दूत.पहिल्या पावसाच्या सरींची बातमी घेऊन येणारा लाल मखमली पाहुणा.
ही परंपरा टिकवायची असेल तर पाऊस जपावा लागेल,जंगलं जपावी लागतील,माती जपावी लागेल आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे निसर्गातील अगदी छोट्यातल्या छोट्या जीवाचे अस्तित्वही जपावे लागेल.
माणसाने निसर्ग जपण्याचा विचार स्वतः पासून सुरवात करीत पाऊस, माती, जंगलं आणि निसर्गातील अगदी छोट्यातल्या जीवाचंही अस्तित्व जपलं तरच आपल्या पुढच्या पिढ्यांना निसर्गाची खरी ओळख करून देता येईल.
कारण कधीकधी निसर्गाचे सर्वात मोठे संदेश हे सर्वात लहान जीवच घेऊन येत असतात.