BHIVANDI : भिवंडीत ठाणे महानगर पीएनजी गॅसची पाइपलाइन फुटली; वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

भिवंडी : भिवंडी-कल्याण बायपास मार्गावर ठाणे महानगर पीएनजी गॅसची पाइपलाइन फुटल्याची घटना घडली असून काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि संबंधित गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करत भिवंडीतील वाहनांसाठीचा पीएनजी गॅस पुरवठा तात्पुरता बंद केला. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.