खेड (प्रतिनिधी) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खेड नगरपरिषदेने शहरातील विविध भागांमधील अत्यंत धोकादायक झालेल्या वृक्षांच्या तोडणीची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला नागरिकांचे सहकार्य लाभावे यासाठी खेड नगरपरिषदेचे शिवसेना गटनेते तथा प्रतोद श्री. निकेतन अनंत पाटणे यांनी शहरवासीयांना आवाहन केले आहे.
खेड शहरातील काही भागांमध्ये जुनाट, पडण्याच्या स्थितीत असलेले तसेच वादळी वाऱ्यामुळे कोसळण्याची शक्यता असलेले वृक्ष नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेसाठी धोका निर्माण करू शकतात. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नगरपरिषदेने अशा वृक्षांची ओळख पटवून आवश्यक ती कार्यवाही सुरू केली आहे.
शहरातील नागरिकांच्या निदर्शनास अत्यंत धोकादायक वृक्ष आल्यास त्यांनी तातडीने आपल्या प्रभागातील लोकप्रतिनिधींना अथवा खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. माधवीताई बुटाला यांना त्याची माहिती द्यावी, असे आवाहन श्री. पाटणे यांनी केले आहे. तसेच केवळ अत्यंत गरजेचे व सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या वृक्षांचीच माहिती प्रशासनाकडे द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
येत्या दोन दिवसांत नागरिकांनी अशा वृक्षांची माहिती नगरपरिषदेकडे सादर करावी. प्राप्त माहितीनुसार संबंधित ठिकाणांची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन गटनेते निकेतन पाटणे यांनी केले आहे.












