“जिथे चांगला रस्ता संपला, तिथे हद्द संपली” — योगेश कदमांचा भास्कर जाधवांना अप्रत्यक्ष टोला;

संगलट गावात उबाठाचे शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, भास्कर जाधवांना मोठा धक्का

खेड (प्रतिनिधी) –
खेड तालुक्यातील संगलट गावात सोमवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे कथा मोठे खिंडार पडले असून गावातील शेकडो नागरिकांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश केला. यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी गेल्या काही दिवसांपासून खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात होत असलेल्या मेळाव्यांचा नाव न घेता समाचार घेतला. यावेळी त्यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर नाव न घेता “जिथे चांगला रस्ता संपला, तिथे हद्द संपली” टीका करत त्यांच्या विकासाची पोलखोलच केली.
सांगायचं तर, या कार्यक्रमात संगलट गावातील शेकडो उबाठा पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत घरवापसी केली. कार्यक्रमात कदम म्हणाले की, रामदासभाईंनी केलेल्या विकासकामांना पुढे नेण्याची जबाबदारी आता त्यांच्या कडे आहे. त्यांनी स्पष्ट केले की, फक्त भाषण देऊन नेते काम करू शकत नाहीत; प्रत्यक्ष काम आणि विकास पाहिला जातो. यावेळी बोलताना पुढे कदम म्हणाले की, “मी भाषणासाठी आलो नाही, भाषण मी विधानसभेत करतो. आमदाराचे काम म्हणजे अधिवेशनात बोलणे आणि मतदारसंघात काम करणे. काही लोक फक्त मंचावर बोलतात, पण काम प्रत्यक्षात दिसत नाही,” या विधानातून भास्कर जाधव यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावला.
त्यांनी सांगितले की, दापोली मतदारसंघातील विकासाप्रमाणेच गुहागर मतदारसंघातील प्रत्येक गाव आणि वाडीमध्ये विकासकामे केली जातील. संगलट गावातील या घरवापसीने हे स्पष्ट झाले की, जनता आता विकासावर विश्वास ठेवते आणि फक्त आश्वासनं देणाऱ्या नेत्यांवर नाही.
कदम यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आश्वासन दिले की, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अण्णा कदम यांचा विजय निश्चित असून, रामदासभाईंनंतर थांबलेला विकास पुन्हा सुरू केला जाईल. या कार्यक्रमानंतर गुहागर मतदारसंघात राजकीय वातावरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता दिसून आली आहे. कधीतरी गेल्या काही आठवड्यांपासून खाडीपट्टा विभागात कार्यकर्ते मेळावा पार पडत होते. या मेळाव्यामधून शिवसेना नेते व आमदार यांच्यावर जहरी टीका देखील केली जात होती. या टीकेला स्थानिक शिवसेना पदाधिकारी यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले होते. मात्र शिवसैनिकांनी व येथील नागरिकांनी विकासाच्या दृष्टीने निर्णय घेऊ शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश करून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का दिल्याचे या निमित्त पहावयास मिळत आहे.