जीर्ण शाळेला माजी विद्यार्थ्यांची नवसंजीवनी; श्रमदानातून उभारल्या नव्या वर्गखोल्या

दापोली : विशेष प्रतिनिधी – 

दापोली तालुक्यातील डौली गावातील ५५ वर्षे जुन्या जिल्हा परिषद मराठी शाळेचे लोकसहभाग, श्रमदान आणि माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून पुनरुज्जीवन करण्यात आले असून, नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी नव्याने उभारलेल्या सुरक्षित वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घेणार आहेत. ग्रामीण भागातील शाळांच्या दुरवस्थेवर अनेकदा चर्चा होत असताना डौली गावाने कृतीतून आदर्श घालून दिला आहे.

डौली येथील जिल्हा परिषद मराठी शाळा ही गावातील अनेक पिढ्यांना शिक्षणाची दिशा देणारी संस्था आहे. मात्र गेल्या काही वर्षांत शाळेची इमारत अत्यंत जीर्ण झाली होती. छताची पडझड, भिंतींना पडलेले तडे आणि ढासळलेल्या वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होत होती. अशा अवस्थेतही शिक्षक आणि विद्यार्थी शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवत होते.
शाळेची दयनीय अवस्था शिक्षकांनी एका व्हॉट्सॲप समूहाद्वारे माजी विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दिली. ज्या शाळेने आपल्याला घडवले, त्या ज्ञानमंदिराची झालेली अवस्था पाहून अनेक माजी विद्यार्थी भावूक झाले. त्यानंतर शाळेच्या पुनर्बांधणीसाठी त्यांनी एकत्र येत पुढाकार घेतला.
पुनर्बांधणीसाठी आवश्यक निधी उभारण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने आर्थिक मदत केली. त्याचबरोबर गावातील पालक, ग्रामस्थ आणि विविध स्तरातील नागरिकांनीही या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. अनेकांनी प्रत्यक्ष श्रमदान करत वर्गखोल्यांच्या बांधकामात हातभार लावला. गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे शाळेच्या नव्या इमारतीचे काम वेगाने पूर्णत्वास गेले.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे पुनर्बांधणीसाठी पुढाकार घेणाऱ्या अनेक माजी विद्यार्थ्यांची मुले सध्या याच शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे हा उपक्रम केवळ इमारतीच्या दुरुस्तीपुरता मर्यादित न राहता पुढील पिढीसाठी सुरक्षित, सुसज्ज आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ठरला आहे.
सध्या शाळेच्या नव्या इमारतीचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले असून अंतिम रंगरंगोटीचे काम सुरू आहे. येत्या १५ जूनपासून पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी नव्या वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घेणार असल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशस्वी उपक्रमात सरपंच हरिश्चंद्र महाडीक, उपसरपंच अनंत महाडीक, तंटामुक्ती अध्यक्ष अनंत बाबू महाडिक, अंगणवाडी सेविका आर्वी महाडिक व शीतल गायकवाड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष गणपत जाधव, उपाध्यक्ष रुपेश मारुती महाडिक तसेच समिती सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले. शिक्षक विजय जाधव आणि मधुरा सोमण यांनी सातत्याने पाठपुरावा करून शाळेच्या पुनर्बांधणीसाठी विशेष प्रयत्न केले.
लोकसहभाग, श्रमदान आणि शिक्षणाप्रती असलेली निष्ठा यांच्या बळावर डौली गावाने ग्रामीण भागासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. समाज एकत्र आल्यास अशक्य वाटणारी कामेही यशस्वीपणे पूर्ण होऊ शकतात, याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.