गुहागर | प्रतिनिधी :
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या विशेष ग्रामसभेमध्ये पर्यावरण संरक्षण, स्वच्छता व प्लास्टिकमुक्त गाव या उद्देशाने महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी नियमांनुसार, न्यायालयाच्या निर्देशांनुसार ग्रामपंचायत हद्दीतील कोणताही दुकानदार, व्यावसायिक अथवा नागरिक यांनी प्लास्टिक पिशव्यांची विक्री, साठवणूक अथवा वापर करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामसभेच्या ठरावानुसार प्लास्टिक पिशव्यांचा वापर किंवा विक्री करताना आढळून आल्यास खालीलप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम आढळल्यास ५०० रुपये दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास १,२०० रुपये दंड, तिसऱ्यांदा आढळल्यास संबंधित व्यक्ती/व्यापाऱ्याविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे ठरविण्यात आले.











