प्रवासी व चालक थोडक्यात बचावले, रिक्षेचे मोठे नुकसान
9
सावंतवाडी : शिरोडा-सावंतवाडी मार्गावरील आजगाव वाघबीळ येथील धोकादायक वळणावर आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. सुदैवाने केवळ ‘दैव बलवत्तर’ म्हणून रिक्षाचालक आणि रिक्षेतील प्रवासी या अपघातातून थोडक्यात बचावले. मात्र, अपघातामुळे रिक्षा रस्त्याशेजारील झाडावर आदळल्याने रिक्षेचे प्रचंड नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक दिगंबर शंभा केरकर (रा. आरोंदा) हे आपल्या ताब्यातील रिक्षा (क्रमांक MH 07 AH 1246) घेऊन शिरोडा येथून सावंतवाडीच्या दिशेने एका प्रवाशाला घेऊन जात होते. याच वेळी सावंतवाडीकडून रेडीच्या दिशेने जाणारा ट्रक (क्रमांक MH 09 GJ 9747), जो चालक एम. डी. सोहेल (रा. झारखंड) हा चालवत होता, तो वाघबीळ येथील वळणावर थेट रिक्षेच्या अंगावर आला. दोन्ही वाहनांची जोरदार धडक होऊन रिक्षा बाजूच्या झाडावर जाऊन आदळली.
या अपघातात रिक्षेतील प्रवासी श्रीम. पेडणेकर या जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने शिरोडा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रिक्षाचालक दिगंबर केरकर यांना सुदैवाने किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघाताची माहिती सामाजिक कार्यकर्ते दिनेश मयेकर (तिरोडा) यांनी तात्काळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच शिरोडा आणि वेंगुर्ला पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शिरोडा पोलीस ठाण्याचे हवालदार प्रसाद कदम, योगेश मांजरेकर, कॉन्स्टेबल दीपा मठकर तसेच वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे मंगल मोखरे व कॉन्स्टेबल अनिल जाधव यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि वाहतूक कोंडी फोडून रस्ता मोकळा केला.
बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप
आजगाव वाघबीळ येथील रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडी आणि तुटलेली लोखंडी संरक्षक रेलिंग (गडद) यांमुळे हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. झाडी वाढल्यामुळे वाहनचालकांना समोरील वाहन दिसत नाही, तसेच रस्त्याच्या बाजूला खोल दरी असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग या तुटलेल्या रेलिंगकडे पूर्णपणे डोळेझाक करत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.












