सावंतवाडी । प्रतिनिधी :येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील ७ विद्यार्थ्यांची ‘सीमेन्स’ (Siemens) या जागतिक कीर्तीच्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली आहे. कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पूल कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये या विद्यार्थ्यांनी हे दैदिप्यमान यश संपादन केले.
कंपनीच्या वतीने घेण्यात आलेल्या या निवड प्रक्रियेत कॉलेजच्या मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल विभागातील एकूण २३ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. यामध्ये विविध खडतर तांत्रिक चाचण्या आणि मुलाखतींचे टप्पे पार पडले. या सर्व फेऱ्यांमध्ये आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत भोसले इन्स्टिट्यूटच्या ७ विद्यार्थ्यांनी अंतिम निवडीत स्थान मिळवले.
गोवा युनिटमध्ये मिळणार कामाची संधी
या विद्यार्थ्यांची निवड सीमेन्स कंपनीच्या गोवा युनिटसाठी करण्यात आली आहे. कंपनीचे हे युनिट अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. याठिकाणी उच्च दर्जाची इलेक्ट्रॉनिक व ऊर्जा व्यवस्थापन उत्पादने, फॅक्टरी ऑटोमेशन सिस्टीम्स, मायक्रोबॉक्स पीसी, प्रिंटेड सर्किट बोर्ड्स (PCB), स्विचगियर, प्रोटेक्शन रिले तसेच सबस्टेशन ऑटोमेशन उपकरणांचे उत्पादन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानावर काम करण्याचा अनुभव मिळणार आहे.
साडेतीन लाखांचे पॅकेज आणि कौतुकाचा वर्षाव
निवड झालेल्या या विद्यार्थ्यांना सुरुवातीला वार्षिक साडेतीन लाख रुपयांचे (३.५ LPA) आकर्षक पॅकेज देण्यात आले आहे. डिप्लोमा स्तरावर मिळालेल्या या मोठ्या यशामुळे सर्वत्र विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, कॉलेजचे प्राचार्य डॉ. रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले व टीपीओ हेड मिलिंद देसाई यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कॉलेजच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रातून संस्थेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.













