राजापूर शहरातील विविध विकास कामांचा आ. सामंत यांनी घेतला आढावा
राजापूर प्रतिनिधी: राजापूर शहरातील विविध विकास कामे व प्रस्ताविक विकास कामांबाबत आमदार किरण सामंत यांनी गुरूवारी एक विशेष बैठक घेत या कामांचा आढावा घेतला. तर नगर परिषदेच्या प्रस्तावित नवीन कार्यालयीन इमारतीसह अन्य विकास कामांचा आढावा घेत लवकरच ही कामे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करून मागीं लावली जातील असेही यावेळी आ. सामंत यांनी या बैठकीत सांगितले. तर राजापूर शहराच्या विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाहीही यावेळी आ. सामंत यांनी दिली.
राजापूर शहरात शासनाच्या विविध योजनांतर्गत सध्या सुरू असलेली विकास कामे, मंजूर झालेली विकास कामे व प्रस्तावित असलेली विकास कामे यांची सद्य परिस्थिती काय आहे हे जाणून घेऊन शहराच्या विकासाच्या दृष्टीने ही कामे तातडीने मार्गीं लावण्यासाठी आ. किरण सामंत यांनी गुरूवारी राजापूर शासकिय विश्रामगृहावर नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांची एक विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीला नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे, उपनगराध्यक्ष विनय गुरव, काँग्रेसचे गटनेते एड. जमिर खलिफे, शिवसेना गटनेते एड. राहुल तांबे यांसह मुख्याधिकारी अभिजित कुंभार व सर्व नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी आ. सामंत यांनी शहरात सध्या शासनाच्या विविध योजनांतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत आढावा घेतला. ही कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सुचना करतानाच कामाचा दर्जा जपा असे आदेशही आ. सामंत यांनी दिले. तर शासनस्तरावरून मंजूर होऊन आलेल्या कामांचा आढावाही आ. सामंत यांनी यावेळी घेतला.
तर शहरात नगर परिषदेच्या प्रस्तावित असलेल्या नवीन कामांचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये नगर परिषदेची नवीन शासकिय इमारतीचे १५ कोटी, बहुउद्देशिय सभागृह बांधणे ३ कोटी, मच्छी व मटण मार्केट उभारणे ३ कोटी, सफाई कर्मचारी निवासस्थान व कंपाऊंड वॉल १ कोटी व शहरातील नगर परिषदेच्या मालकीच्या शाळा दुरूस्त करणे, तळी स्वच्छ करणे व उद्यानांचे सुशोभिकरण करणे ३ कोटी या कामांचाही आढावा यावेळी आ. सामंत यांनी घेतला. याबाबत पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्यासोबत बैठक करून ही सर्व कामे निधी उपलब्ध करून भविष्यात कशा पध्दतीने लवकरात लवकर मार्गी लावता येतील यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही यावेळी आ. सामंत यांनी दिली.
या बैठकीत नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांसह नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबतही आ. सामंत यांनी सकारात्मक चर्चा करत सगळयांनी मिळून शहराच्या विकासाला प्राधान्य द्यावयाचे असे सांगितले.













