एक ताब्यात : सावंतवाडी पोलिसांची कारवाई
सावंतवाडी:
सांगेली देवकरवाडी येथे बेकायदेशीरपणे गोवा बनावटीच्या दारूची विक्री करण्यासाठी साठा करून ठेवल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी एका ५८ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगेली देवकरवाडी येथील रहिवासी अजित दत्ताराम नाईक (वय ५८) हा आपल्या ताब्यात गोवा बनावटीच्या ‘नॅशनल डॉक्टर’ ब्रँड नावाच्या ७५ दारूच्या बॉटल्स बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी, दिनांक १८ जून रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सांगेली येथे छापा टाकला. या छाप्यात नाईक याच्याकडे ९ हजार रुपये किमतीच्या एकूण ७५ बॉटल्स मिळून आल्या. पोलिसांनी हा सर्व माल जप्त करत संशयिताला ताब्यात घेतले.
सदरची यशस्वी कारवाई महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती माधुरी मुळीक, पोलीस हवालदार श्रीमती दूधवडकर आणि पोलीस हवालदार दीपक शिंदे यांच्या पथकाने केली. याप्रकरणी रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात संशयित अजित नाईक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.












