ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचा MHT-CET (PCM) परीक्षेत घवघवीत यश; १९ विद्यार्थ्यांना ९० पेक्षा अधिक पर्सेंटाईल

खेड (प्रतिनिधी) : मोरवंडे-बोरज येथील ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटी (PCM) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदाच्या एमएचटी-सीईटी (PCM) परीक्षेत कु. रेहान अब्दुल रज्जाक मुल्ला याने ९८.९० पर्सेंटाईल मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. मनीष सागर पाटील याने ९७.८१ पर्सेंटाईलसह द्वितीय, तर कु. शौर्य संदेश राजेशिर्के याने ९७.३१ पर्सेंटाईल मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे, शाळेतील एकूण १९ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.

या यशामागे विद्यार्थ्यांची कठोर मेहनत, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि संस्थेचे सक्षम शैक्षणिक नियोजन असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. ज्ञानदीप पॅटर्ननुसार विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीपासूनच सीईटी परीक्षेचे विशेष मार्गदर्शन दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती दूर होऊन ते आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जातात आणि उत्तम यश मिळवतात.

यशस्वी विद्यार्थ्यांना श्री. राजेश किट्टद, श्री. जयवंत पिसे, सौ. प्राजक्ता बागल, श्री. समीर वाजे, सौ. शिल्पा आग्रे यांच्यासह तज्ज्ञ मार्गदर्शक श्री. निखिल भोसले, श्री. सोनू कुमार, श्री. जयस्वाल भोले, श्री. अनुपम दुबे, श्री. आशुतोष सिंग आणि श्री. सुमंत पांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, प्रशाला समितीचे चेअरमन अनिल शिवदे, मार्गदर्शक प्रकाश गुजराथी तसेच संस्थेचे पदाधिकारी, सभासद आणि प्रशालेचे मुख्याध्यापक भरत मोरे यांच्यासह ज्ञानदीप विद्या संकुलातील सर्व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.