सह्याद्री ॲडव्हेंचर आणि बाबल अलमेडा टीमचे ३ तास अथक प्रयत्न; नातेवाईकांचा टाहो
दोडामार्ग | सुहास देसाई
विर्डी येथील प्रसिद्ध वझर सखल धबधब्यात गुरुवारी बुडून बेपत्ता झालेल्या विजय दोडमणी (वय २३) या कर्नाटकातील युवकाचा मृतदेह अखेर शनिवारी, म्हणजेच तिसऱ्या दिवशी बाहेर काढण्यात यश आले. सिंधुदुर्गातील ‘सह्याद्री ॲडव्हेंचर’ आणि ‘बाबल अलमेडा’ टीमने तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हा मृतदेह खोल डोहातून बाहेर काढला. मृतदेह बाहेर काढताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या अश्रूंचा बांध फुटला.
ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने लागला होता शोध
कर्नाटक येथील धारवाड येथून ७ युवक विर्डी येथील वझर सखल धबधब्यावर मौजमजा आणि आंघोळीसाठी आले होते. आंघोळ करत असताना विजय दोडमणी हा युवक पाण्याचा अंदाज न आल्याने खोल डोहात बुडाला आणि बेपत्ता झाला. घटनेची माहिती मिळताच शुक्रवारी (दुसऱ्या दिवशी) सिंधुदुर्गातील सह्याद्री ॲडव्हेंचर आणि बाबल अलमेडा यांचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी धबधब्याच्या खोल डोहात ड्रोन कॅमेरा सोडून सुमारे एक तास शोध घेतला. अथक प्रयत्नांनंतर मृतदेह ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला. मात्र, उपलब्ध साधनसामग्रीच्या मर्यादा आणि संध्याकाळी झालेला काळोख यामुळे शुक्रवारी रेस्क्यू ऑपरेशन थांबवावे लागले होते.
तीव्र प्रवाहाशी झुंज देत ३ तासांचे रेस्क्यू ऑपरेशन
शनिवारी सकाळी पुन्हा ९.३० वाजता रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. धबधब्याचा पाण्याचा प्रवाह अत्यंत तीव्र असल्याने मृतदेह हाती लागण्यात अनेक अडचणी येत होत्या. अखेर उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने आणि जीवाची बाजी लावून टीमने दुपारी १२.३० वाजता, म्हणजेच तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढला. तीन दिवस पाण्यात असल्याने मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता.
डोंगर-दगडातून ३ तास पायी चालत आणला मृतदेह
धबधब्याचा परिसर दुर्गम असल्याने मृतदेह मुख्य रस्त्यापर्यंत आणणे हे मोठे आव्हान होते. रेस्क्यू टीम आणि स्थानिक ग्रामस्थांनी मृतदेह खांद्यावर घेऊन डोंगर, दऱ्या आणि खडकाळ भागातून तब्बल तीन तास पायी वाटचाल केली. अनेक अडचणींचा सामना करत मृतदेह मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीपर्यंत आणण्यात आला. त्यानंतर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे धारवाड आणि विर्डी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.











