उत्तरपत्रिका फेरतपासणीत ४ गुणांची वाढ

सावंतवाडीचा विराज राऊळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय ; मुलांमध्ये प्रथम

सावंतवाडी । प्रतिनिधी :दहावीच्या परीक्षा निकालाच्या उत्तरपत्रिका फेरतपासणीत तब्बल ४ गुणांची घवघवीत वाढ झाल्याने, सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलचा तंत्रशुद्ध आणि गुणवंत विद्यार्थी कु. विराज नंदकिशोर राऊळ याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाचव्या क्रमांकावरून थेट द्वितीय क्रमांक पटकावला आहे. फेरतपासणीनंतर विराजला आता ९९.८० टक्के गुण मिळाले असून, अवघ्या एका गुणामुळे त्याचे १०० टक्के गुणांसह जिल्ह्यातील प्रथम स्थान हुकले आहे. मात्र, या सुधारित निकालामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलग्यांमध्ये त्याने प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

८ मे रोजी जाहीर झालेल्या मूळ निकालात विराजला ५०० पैकी ४९५ गुण (९९ टक्के ) मिळाले होते. त्या गुणांनुसार तो सावंतवाडी तालुक्यात तिसरा आणि जिल्ह्यात पाचवा आला होता. परंतु, आपल्याला यापेक्षा अधिक गुण मिळायला हवेत, अशी साशंकता आणि दृढ आत्मविश्वास विराजला होता. त्यामुळे त्याने तातडीने उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीसाठी अर्ज केला होता. या फेरतपासणीत त्याच्या संस्कृत विषयात ३ गुण आणि भूगोल विषयात १ गुण अशी एकूण ४ गुणांची मोठी वाढ झाली. परिणामी, त्याचा एकूण स्कोअर ५०० पैकी ४९९ गुणांवर (९९. ८० टक्के) पोहोचला आणि जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत त्याचे स्थान दुसऱ्या क्रमांकावर झेप घेते झाले. या यशस्वी प्रक्रियेत त्याला त्याचे पालक, मिलाग्रीस हायस्कूलचे प्राचार्य व शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

मूळचा मळगावचा सुपुत्र असलेल्या विराजला शैक्षणिक आणि अवांतर क्षेत्राचा मोठा वारसा आहे. तो ओटवणे हायस्कूलचे शिक्षक नंदकिशोर राऊळ यांचा मुलगा, तर शिवसेना माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघ विभागप्रमुख उमेश गावकर आणि ‘दैनिक तरुण भारत’चे पत्रकार गावकर यांचा भाचा आहे.

विराजने यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवली आहे. इयत्ता ५ वी आणि ८ वी मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद (पुणे) मार्फत घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेत त्याने सिंधुदुर्ग जिल्हा सर्वसाधारण गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते. तसेच, ८ वी मध्ये असताना विज्ञान प्रदर्शनातील विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत त्याने जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला होता. शैक्षणिक प्रगतीसोबतच त्याला चित्रकलेची विशेष आवड असून, हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच काढण्यात तो माहीर आहे. याशिवाय, त्याने हार्मोनियमच्याही तीन परीक्षा यशस्वीपणे दिल्या आहेत. फेरतपासणीतील या ऐतिहासिक गुणांच्या वाढीमुळे आणि विराजच्या या दैदिप्यमान यशामुळे मळगाव, सावंतवाडीसह संपूर्ण जिल्ह्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.