ज्ञानदीप वाचनालय, गोवेरी येथे ग्रंथोत्सव व विद्यार्थी गौरव सोहळा उत्साहात संपन्न
सावंतवाडी । प्रतिनिधी :
“मोबाईलचे मेसेज वाचणे म्हणजे वाचक नव्हे, तर जोपर्यंत तुम्ही हातात पुस्तकाचे पान घेत नाही आणि ते वाचत नाही, तोपर्यंत तुम्ही वाचक नाही. मी गुणवंत, यशवंत आणि बुद्धीवंत आहे हे तुम्ही तुमच्या वागण्या-बोलण्यातून सिद्ध करा. दहावी-बारावी झाल्यानंतर कुठल्या शाखेत जाणार, याचा अगोदर परिपूर्ण अभ्यास करा आणि नंतरच तुमचं क्षेत्र निवडा; मग पहा यशाची पहिली पायरी तुम्ही गाठली हे सिद्ध होईल आणि पुढील जीवनात तुम्ही एक ‘इंटेलिजन्स व्यक्ती’ म्हणून गणले जाल,” असे प्रतिपादन संवाद तरुण भारतचे सावंतवाडी प्रतिनिधी, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव तथा जिल्हा ग्रंथालय संचालक ॲड. संतोष सावंत यांनी केले.
कुडाळ तालुक्यातील गोवेरी येथील ‘ज्ञानदीप वाचनालय व ग्रंथ संग्रहालय’ यांच्या वतीने ग्रंथोत्सव व गावातील दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. संतोष सावंत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक तथा राज्यस्तरीय ग्रंथ मित्र पुरस्कार विजेते व नगर वाचन मंदिर मालवणचे ग्रंथपाल श्री. संजय शिंदे, डॉ. श्री. विक्रम आजगेकर, ज्ञानदीप वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री. महेश गावडे, विद्यमान अध्यक्ष श्री. सतीश गावडे, उपाध्यक्ष राजू राऊळ, सचिव श्री. सूर्यकांत गावडे, श्री सत्पुरुष कला क्रीडा मंडळाचे सचिव दीपक गोवेरकर उपस्थित होते. तसेच गुरुनाथ गावडे, सुरज गावडे, जितेंद्र गावडे, दीपेश गोवेरकर, ग्रंथपाल श्री. धोंडी गावडे, श्री. प्रदीप जाधव, वैभव गावडे, पांडुरंग गावडे आणि शिपाई अनंत गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रंथोत्सवाचे उद्घाटन व विद्यार्थ्यांचा गौरव
प्रारंभी ग्रंथोत्सवाचे फीत कापून उद्घाटन ॲड. संतोष सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गावातील दहावी व बारावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा फोल्डर, गुलाबपुष्प आणि सुपारीचे झाड देऊन विशेष गौरव करण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष सतीश गावडे यांच्या हस्ते ॲड. संतोष सावंत, संजय शिंदे, विक्रम आजगेकर आदींचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
मान्यवरांचे मार्गदर्शन
अध्यक्षीय भाषणात ॲड. सावंत पुढे म्हणाले, “गोवेरी ग्रंथालय हे खरोखरच सिंधुदुर्ग जिल्ह्याला सांस्कृतिक, साहित्यिक चळवळ व गावच्या विकासाचे केंद्र आहे. या ग्रंथालयाने गावातील प्रत्येक घरात आज वाचक निर्माण केले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून पुढील काळात हेच विद्यार्थी ही साहित्य चळवळ पुढे नेतील. विद्यार्थ्यांनी मोबाईलमधील वाचनापेक्षा पुस्तकांच्या वाचनाला प्राधान्य देऊन अशा ग्रंथोत्सवाला प्रोत्साहन दिले पाहिजे. मार्गदर्शक सगळेच असतात, पण त्यातील असा मार्गदर्शक शोधा की जो तुम्हाला यशवंततेची वाट सोपी करेल.”
यावेळी डॉ. विक्रम आजगेकर यांनी आपले विचार मांडताना सांगितले, “माझे वडील पुस्तक वाचायचे म्हणून मी पुस्तक वाचत गेलो आणि घडत गेलो. पुस्तक वाचन माणसाला प्रगल्भ बनवते. विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचावीत आणि आपल्याला पुढे काय करायचे आहे हे आताच ठरवावे.”
ग्रंथ मित्र पुरस्कार विजेते संजय शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “तुम्ही वाचाल तर वाचाल! जोपर्यंत तुम्ही पुस्तक वाचत नाही तोपर्यंत तुमची प्रगती नाही. परीक्षेत गुण किती मिळाले यापेक्षा तुम्ही पुढील जीवनात काय करणार आहत, हे अधिक महत्त्वाचे आहे.”
प्रास्ताविक आणि आभार
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात वाचनालयाचे अध्यक्ष सतीश गावडे यांनी वाचनालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, “या वाचनालयात सध्या १७०० हून अधिक पुस्तकांचा संच असून, ५०० हून अधिक सभासद आहेत. दरवर्षी वाचनालयातर्फे विविध उपक्रम राबवले जातात. गावातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर यशाची थाप मारून त्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहित करण्यासाठीच आम्ही हा सोहळा घेत आहोत.”
यावेळी काही यशस्वी विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री. महेश गावडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार ग्रंथपाल श्री. धोंडी गावडे यांनी मानले. या सोहळ्याला गोवेरी गावातील विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













