वार्तापत्र -कोकण. संतोष वायंगणकर
ऋतुचक्रातील या अनिश्चिततेने सारेच बदललेय. पाऊस केव्हा सुरू होणार याची प्रतिक्षा केवळ कोकणातील शेतकऱ्यांनाच आहे असे नव्हेतर पाण्याचे उद्भव देखिल कमी-कमी होऊ लागले आहेत. आता कोकणात पुरेसा पाऊस होईल की नाही याबद्दल शंकाच व्यक्त होत आहे. एकतर पावसालाच सुरूवात नाही. यामुळे एकापेक्षा अनेक प्रश्नांची गुंतागुंत निर्माण झाली आहे.कोकणावरही कधी नव्हे तो निसर्ग कोपला आहे. यामुळे अनेक भागात दुबार पेरणीचे संकट तर अनेक भागात तरवा जगविण्याची धडपड शेतकऱ्यांसमोर उभी आहे…
कोकणात ७ जूनला सर्वसाधारणपणे मृग नक्षत्रापासून पावसाला सुरूवात होते. तसे पावसाची वर्दी मे महिन्यातच अवकाळी पावसाने दिली जाते. मे महिन्याच्या पहिल्या किंवा शेवटच्या पंधरवड्यात पाऊस हजेरी लावतो. मग मध्येच पंधरा दिवस गायब होतो. आणि एकदा का ७ जूनचा मृग नक्षत्राचा मुहर्त पावसाने आरंभला की तो थांबतच नाही. कोकणातील अशी ही पावसाची औरच सैर असते. परंतु गेल्याकाही वर्षात एकूणच ऋतुचक्र बदलले आहे. पाऊस केव्हा येईल, केव्हा जाईल काहीच अंदाज देता येणारा नाही. यावर्षी तर उष्णतेने टोक गाठलं, कहरच झाला.. इतकी उष्णता वाढली आहे की आजही एप्रिल-मे महिन्यात जशी स्थिती असते तशीच नव्हे तर त्यापेक्षाही उष्णता यावर्षी भयंकर झाली आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हाने कोकण अक्षरश: भाजून निघाले आहे. कोकणातील नद्या, नाले, ओहोळ पुराने दुथडी भरून वहाण्याच्याकाळात सर्वत्र पाणी आटल्याने नदी पात्र कोरडी पडली आहेत. यामुळे पाऊस कधी पडणार याकडे अवघे कोकण डोळे लावून बसले आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा पाऊस आलाच नाही. अधून-मधून काही भागामध्ये एखादी पावसाची सर आली तर येते परंतु पावसाची एखादी सर येते अन जाते.. तीला बळच नसते.. अर्ध्या गावात ती विरुन जाते. वळवाचा पाऊस यावा तशीच तीची तऱ्हा. यामुळे कोकणातील शेतकरी हैराण झाला आहे. कोकणात अलिकडे भातशेती करणाऱ्यांची संख्या फारच कमी झाली आहे. परंपरागत पद्धतीने करण्यात येणारी भातशेती आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. भात शेतीला शेतात काम करणारे मजूर मिळत नाही. यामुळे भातशेती अनेकांनी सोडली आहे. यामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भातशेती क्षेत्र कमी केल्याने शेती पड झाली आहे. मात्र, तरीही कोकणात आजही भात लागवड काही गावातून मोठ्याप्रमाणावर होत आहे. कोकणात मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस आला की भात पेरणी केली जाते. एखाद्या पावसाने भात रोपही चांगली वरती येतात. परंतु यावर्षी कोकणातील शेतकऱ्यांनी ज्या आशा-अपेक्षेने भात पेरणी केली त्यांच्यापुढे मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. पाऊसच पडला नसल्याने भात रूजलेले नाही. काही भागात जे थोड फार भात रूजून आले आहे. त्याला त्यानंतर पाणीच मिळाले नाही. त्यामुळे भातही करपून गेले आहे. कडक उन्हाळ्याने त्याचा परिणामही या भात पेरणीवर झालेला दिसतो. गेल्या अनेक वर्षांपासून कोकणात एकदा का पाऊस सुरू झाला की तो थांबत नाही. भरपूर पाऊस कोसळतो. कोकणातील नदी-नाले दुथडी भरून वहातात. हिरवेगार कोकण या पावसाने सृष्टीला चार चाँद लागावेत अस कोकणातील सृष्टी सौदर्य अधिक उजळून निघते. परंतु पावसाने कोकणातही पाठ फिरवल्याने जून, जुलै महिन्यात कोकणातील शेतकरी भातशेती बरोबरच काजू, आंबा आदी पिकांसाठीही पावसाची आवश्यकता आहे. कोकणातील पाण्याचे उद्भव देखिल कमी झाले आहेत. अवकाशात काळे ढग दिसले की कोकणातील शेतकरी काही क्षण सुखावतो. परंतु काळे ढग पुढे सरकले की अरे, पाऊस पडत नाही म्हणून डोक्याला हात लावतो. सांगली, सातारा जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यातून तर पूर्वी पाण्याचे दुर्भिक्ष असायचे. सातारा, सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावांमधून दौरा करताना पाण्यासाठी तिथल्या ग्रामस्थांची होणारी वण-वण पाहिली आहे. अलिकडे ताकारी सारखा पाटबंधारे प्रकल्पामुळे कवंठेमहाकाळ, आटपाटीसारख्या दुष्काळग्रस्त तालुक्यातील गावांची आज पाण्याची स्थिती बदलली आहे. सांगली जिल्ह्यातील जत सारखा दुष्काळग्रस्त भाग आज बऱ्यापैकी सुधारला आहे. आकाशातील काळोख करून येणाऱ्या पळणाऱ्या ढगांमुळे पहात दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी दिसायचा. कोकणातही थोड्याफार फरकाने वेगळी स्थिती नाही. आज कोकणातील शेतकरी आकाशातील दाटून आलेल्या ढगांकडे पहातोय. तोपर्यंत ढग पुढे सरकलेले असतात.
ऋतुचक्रातील या अनिश्चिततेने सारेच बदललेय. पाऊस केव्हा सुरू होणार याची प्रतिक्षा केवळ कोकणातील शेतकऱ्यांनाच आहे असे नव्हेतर पाण्याचे उद्भव देखिल कमी-कमी होऊ लागले आहेत. पाण्याचे साठे आठल्याने भिषण पाणी टंचाईला सामारे जावे लागू लागेल की काय ? अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोकणात पुरेसा पाऊस होईल की नाही याबद्दल शंकाच व्यक्त होत आहे. एकतर पावसालाच सुरूवात नाही. यामुळे एकापेक्षा अनेक प्रश्नांची गुंतागुंत निर्माण झाली आहे. विहिरींचे पाणी साठे कमी झाल्याने त्याचा विपरित परिणाम अन्य उद्योगव्यवसाय क्षेत्रावरही होऊ लागला आहे. पाण्याची टंचाई जाणवणारी असल्याने त्याचा परिणाम थेट इमारत बांधकामावरही होताना दिसत आहे. कोकणावरही कधी नव्हे तो निसर्ग कोपला आहे. यामुळे अनेक भागात दुबार पेरणीचे संकट तर अनेक भागात तरवा जगविण्याची धडपड शेतकऱ्यांसमोर उभी आहे.
आंबा, काजू व्यवसायावर त्याचा परिणाम झालेला परंतु शेवटच्या टप्यात आंब्याच पिक झालं आणि कोकणातील शेतकरी बऱ्यापैकी सावरला काही भागात आंबा पुरेशा प्रमाणात झाला नाही. काही आंबा बागायतदारांचे नुकसान झाले. परंतु काही आंबा बागायतदार शेतकऱ्यांना निसर्गाने तारले आहे. सध्याचे वातावरण पाहिल्यावर अनेकांना १९७२ साली महाराष्ट्रात आलेल्या दुष्काळाची आठवण होत आहे असे जुने-जानते सर्वसामान्य शेतकरी सांगत आहेत. शेतकऱ्यांना कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जनतेला आता केव्हा एकदा पावसाच्या सततधारेत अवघे कोकण न्हाऊन निघते याचीच प्रतिक्षा आहे.












