मुंबई-गोवा महामार्गावर नेमळेत गोव्यातील थार गाडीचा भीषण अपघात

कार दरीत कोसळून दोन महिलांचा मृत्यू ; तिघे गंभीर जखमी

सावंतवाडी:मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप पत्रादेवी बायपासवर नेमळे-एरंडवाकवाडी परिसरात आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. गोव्यातून कणकवलीच्या दिशेने जाणारी थार कार चालकाचा ताबा सुटल्याने महामार्गालगतच्या दरीत कोसळली. या दुर्दैवी घटनेत कारचा चक्काचूर झाला असून, दोन महिलांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

      मिळालेल्या माहितीनुसार, गोवा सालीगाव येथील जीए-०३-एएम-८४७८ क्रमांकाची थार कार गोवा येथून मुंबई-गोवा महामार्गाच्या झाराप-पत्रादेवी बायपासवरून कणकवली भिरवंडे येथे जात होती. नेमळे एरंडवाकवाडी येथील स्वामी समर्थ मंदिराजवळील पुलापाशी आली असता, वाहनाचा वेग जास्त असल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार रस्त्याबाहेर थेट दरीत कोसळली.

या अपघातात कार मधील श्रीमती नानोडकर (वय ४३, रा‌. गिरी-गोवा) आणि विलासिनी सातार्डेकर (वय ५३, रा‌. भिरवंडे-कणकवली) या दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना स्थानिकांच्या मदतीने १०८ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर कारचालक सनी नानोडकर (वय ४०), उज्वला कांबळी (वय ५०) आणि पांडुरंग नानोडकर (वय ६५, सर्व रा. गिरी-गोवा) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस, नेमळे येथील स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा‌. सतीश बागवे, शैलेश नाईक, रवी जाधव, लक्ष्मण कदम आणि रूपा मुद्राळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तातडीने कारबाहेर काढून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व १०८ रुग्णवाहिकेने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत, डॉ. गिरीश चौगुले, डॉ. निखील अवधूत, परिचारिका श्रीमती गोसावी व श्रीमती नाईक यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले. यादरम्यान रुग्ण कल्याण समितीचे सदस्य देव्या सुर्याजी आणि रवी जाधव यांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबाला धीर दिला. मात्र, रुग्णालयातील काही उपचारांबाबत सदस्य श्री. सुर्याजी व रवी जाधव यांनी नाराजीही व्यक्त केली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत धोत्रे, मनोज राऊत, प्रिया नाईक आणि निलेश नाईक यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया सुरू असून, सावंतवाडी पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.