आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला यश; अर्जुना प्रकल्प परिसरातील रस्ते दुरुस्ती व पाचल -तळवडे पुलासाठी निधी मंजूर

राजापूर | प्रतिनिधी :तालुक्यातील अर्जुन मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील विविध विकासकामांना अखेर गती मिळाली आहे. आमदार किरण सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रस्ते दुरुस्ती आणि पाचल-तळवडे गावांना जोडणाऱ्या नव्या पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अर्जुन प्रकल्प उभारणीनंतर परिसरातील अनेक गावांमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली होती. विशेषतः पावसाळ्यात रस्ते खचणे, वाहतुकीत अडथळे निर्माण होणे आणि नागरिकांसह शेतकरी व विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन आमदार किरण सामंत यांनी जलसंपदा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत विशेष निधीची मागणी केली होती.

या पाठपुराव्याला यश मिळाल्यानंतर अर्जुन प्रकल्पाच्या उजवा व डावा कालवा परिसरातील पांगरी, करक, कारवली, पाचल, तळवडे, रायपाटण, हरळ, विलवडे, रिंगणे, आरगाव आणि परूळे या गावांमधील सुमारे ३० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे गावांमधील अंतर्गत संपर्क व्यवस्था सुधारण्यास मोठी मदत होणार असून शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

याशिवाय पावसाळ्यात अर्जुन नदीला येणाऱ्या पुरामुळे पाचल आणि तळवडे गावांमधील संपर्क वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर सुरक्षित व कायमस्वरूपी पुलाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या मागणीची दखल घेत पाचल-तळवडे गावांना जोडणाऱ्या नव्या पुलाच्या बांधकामासाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे.

जलसंपदा विभागामार्फत विशेष बाब म्हणून हा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, यासाठी आ. किरण सामंत यांनी शासन स्तरावर सातत्यपूर्ण प्रयत्न केले. स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि विविध सामाजिक संघटनांनीही या कामांसाठी पाठपुरावा केला होता.

या विकासकामांमुळे अर्जुन प्रकल्प परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असून ग्रामीण भागातील संपर्क सुधारण्यास मोठी मदत मिळणार आहे. नव्या पुलामुळे पावसाळ्यातील वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी आ. किरण सामंत यांचे आभार मानत मंजूर झालेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे.