– नरेंद्र मोहिते, राजापूर
वाढदिवस विशेष
महाराष्ट्राच्या राजकारणात आपला स्पष्टवक्तेपणा, आक्रमक शैली आणि विकासाभिमुख भूमिकेमुळे आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण करणारे नाव म्हणजे राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश नारायणराव राणे होत. त्यांच्याकडे असलेल्या या मंत्रीपदाच्या माध्यमातून कोकणाच्याच नाही तर राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी विविध पायाभूत सुविधा, मत्स्यव्यवसाय आणि सागरी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय व केलेले काम हे निश्चितच राज्याच्या विकासात्मक प्रगतीत महत्वपूर्ण असे आहे. काम कोणतेही असो झोकून देत करताना त्याला पुरेपुर न्याय देण्याची त्यांची धडाडी, अभ्यासू वृती आणि विकासाच्या ध्यास घेऊन काम करण्याची त्यांची जिद्द यामुळे राज्यात एक अव्वल मंत्रालय अशी त्यांनी आपल्या विभागाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
गेल्या दीड वर्षात नितेश राणे यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री म्हणून झपाटून काम करताना या विभागाला दिलेली नवी दिशा आणि केलेले आमुलाग्र बदल यामुळे राज्यात पहिल्या क्रमांकावर त्यांचा विभाग आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचा केलेला गौरवपूर्ण उल्लेख त्यांच्या कामाची साक्ष देतो. राजकारणातील त्यांचे कट्टर विरोधकही जेव्हा त्यांच्या कामाचे कौतुक करतात तेव्हा ना. नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीची चुणूक जाणवते व समस्त कोकणवासीयांना अभिमान वाटतो.
ना. नितेश राणे यांना त्यांचे वडील, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांच्याकडून समाजकारण व राजकारणाचा वारसा लाभला असला तरी स्वतःची कार्यपद्धती आणि जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी देश व राज्यपातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
एक कुशल संघटक असलेल्या ना. नितेश राणे यांचे काम आपल्या मतदार संघापुरते वा एखाद्या जिल्ह्यापुरते मर्यादीत कधीच नव्हते. संपूर्ण राज्यात त्यांचा दबदबा आहे, राज्यभरात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. भाजपाच्या तरूण नेतृत्वातील एक आक्रमक हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित असलेले नेतृत्व अशीही त्यांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात निघालेल्या सकल हिंदू मोर्चांनी हिंदू संघटीत झाले आणि हिंदूत्वाची ताकद हिंदू विरोधकांना चांगलीच कळली. त्यामुळे ‘नितेश राणे… सिर्फ नाम ही काफी है…’ अशा प्रतिक्रिया कायम उमटत असतात. राज्यातील मराठा समाज बांधवांच्या पाठीशीही कायमच ठामपणे उभे रहात समाज बांधवांना त्यांनी वेळोवेळी दिलेले पाठबळ समाजाप्रती असलेले त्यांचे प्रेम व सद्भावनेची साक्ष देते.
राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री म्हणून त्यांनी मच्छीमारांच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष दिले आहे. किनारपट्टीवरील बेकायदा मासेमारी रोखण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा मजबूत करणे, मच्छीमारांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे आणि त्यांच्या आर्थिक अडचणी शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार भविष्यात मच्छीमारी व्यवसाय आणि मच्छीमारांना नवी दिशा देणारा असणार आहे.
महाराष्ट्राच्या सागरी क्षमतेचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी विविध प्रकल्पांना गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सागरी पर्यटन, बंदरांचा विकास, जलवाहतूक आणि किनारी भागातील रोजगारनिर्मिती यांवर त्यांनी विशेष भर दिला आहे. राज्यातील सागरी अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रमांचा पाठपुरावा सुरू आहे.
कोकण हा नैसर्गिक संपत्तीने समृद्ध प्रदेश आहे. मत्स्यव्यवसाय, पर्यटन आणि बंदर विकास या तिन्ही क्षेत्रांचा समन्वय साधून कोकणातील युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच मत्स्यव्यवसाय क्षेत्रात महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी नेण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवलेले आहे. त्यांच्या स्पष्ट आणि आक्रमक वक्तव्यांमुळे ते अनेकदा चर्चेतही राहतात, मात्र एक कार्यक्षम आणि निर्णयक्षम नेतृत्व, तातडीने प्रश्न हाताळण्याची वृत्ती आणि विकासकामांबाबतचा पाठपुरावा ही त्यांच्या कामाची पद्धत अनेकांना भावते.
आपल्या कणकवली मतदारसंघात विविध विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी केलेला कायापालट या मतदार संघाला राज्यात एक विकसीत मतदार संघ अशी ओळख निर्माण करून देणारा ठरला आहे. प्रशासनावर मजबून पकड असलेला लोकप्रतिनिधी अशी त्यांची खास ओळख आहे.
ना. नितेश राणे यांचा राजकीय प्रवास हा संघर्ष, जनसंपर्क, विकासकामांचा आग्रह आणि ठाम राजकीय भूमिकांचा संगम आहे. आपल्या या कार्यपद्धतीने त्यांनी महाराष्ट्राच्या समकालीन राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनेक वेळा सभागृहात ना. नितेश राणे बोलत असले की जणू नारायण राणेंचाच भास होत असल्याचे अनेक राजकीय विश्लेषक, जाणकर व पत्रकार आजही सांगतात. आपल्या या काम करण्याच्या आगळ्यावेगळ्या आणि धडाकेबाज पद्धतीने त्यांनी राज्याच्या राजकारणात निर्माण केलेले आपले हे वेगळं स्थान नक्कीच कोकणी माणसासाठी अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे. त्यांचा प्रत्येक विषयावर असलेला गाढा अभ्यास, राज्याच्या हिताचा, अन्यायाचा कोणताही विषय असो तो सभागृहात मांडून धसास लावण्याची त्यांची ती पद्धत आणि आक्रमक अशी शैली विरोधकांनाही कायम धडकी भरवते.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांच्या पावलावर पाऊल टाकत कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे व मंत्री ना. नितेश राणे यांनी समाजकारणात व राजकारणात पाऊल टाकले. वडिलांचा राजकीय वारसा चालविताना या दोन्ही बंधूंनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली. सर्वसामान्य माणसासाठी काहीतरी केलं पाहिजे याचा ध्यास घेऊन खा. राणे काम करतात, तोच वारसा घेऊन समाजातील सर्वसामान्य माणसाच्या विकासाचा ध्यास घेऊन राणे बंधू काम करत आहेत.
ना. नितेश राणेंनी सन २०२४ मध्ये कणकवली, देवगड, वैभववाडी मतदार संघातून तिसऱ्यांदा विजयी होत हॅट्ट्रीक साधली. त्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली आणि कोकणातच नाही राज्यभरात त्यांच्या चाहत्यांकडून एकच जल्लोष करण्यात आला. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांना मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री पदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रीपदाची जबाबदारी स्विकारताच ना. नितेश राणेंनी या विभागातील निर्णयाचा जो धडाका सुरू केला त्याने या खात्यात आमुलाग्र असे बदल झाले व होत आहेत. त्यांच्या कार्याची देशपातळीवरही दखल घेतली गेली.
एक कुशल संघटक असलेल्या ना. नितेश राणे यांच्यावर भाजपा नेतृत्वाने राज्यातील पक्ष संघटनेचीही जबाबदारी दिलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे ते संपर्क मंत्री आहेत. त्यामुळे आपल्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांचे कायमच मार्गदर्शन व भक्कम पाठबळ असते. प्रत्येकाने आपल्या कामातून पक्ष संघटना अधिक बळकट करावी याकडे त्यांचे विशेष लक्ष असते. महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने आगळी वेगळी छाप पाडणाऱ्या या युवा नेत्याला वाढदिवसाच्या आणि भविष्यातील राजकीय वाटचालीकरिता हार्दीक शुभेच्छा…!












