बुलढाणा – समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीडजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. धावत्या ट्रकला फॉर्च्युनर वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर चालकासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. सय्यद आसिफ सय्यद उमर हे पत्नी गुलसितान बी आणि कुटुंबीयांसह नागपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. दरम्यान, समृद्धी महामार्गावरील दुसरबीडजवळ त्यांच्या फॉर्च्युनर वाहनाने समोरून धावणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात डॉ. सय्यद आसिफ सय्यद उमर आणि त्यांची पत्नी गुलसितान बी यांचा जागीच मृत्यू झाला. तर वाहन चालकासह अन्य दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, समृद्धी महामार्गावर विशेषतः बुलढाणा जिल्ह्यात सातत्याने अपघातांच्या घटना घडत असल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.












