सभापती गणेश राणे यांच्या पुढाकारातून देवगड पंचायत समितीत रक्तदान शिबिर; ५२ रक्तदात्यांचा सहभाग

देवगड (प्रतिनिधी)

राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी यंदा वाढदिवस साजरा न करता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते. त्याच दृष्टिकोनातून देवगड पंचायत समितीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देताना, रक्ताची नितांत गरज लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव संबंधित विभागप्रमुखांसमोर ठेवला होता. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करीत असल्याचे प्रतिपादन देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांनी केले.

मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके, पंचायत समिती सदस्य सदाशिव ओगले, विष्णू घाडी, स्नेहा अनुभवणे, अंकुश ठुकरुल, गटविकास अधिकारी निलेश जगताप, सिंधूरक्त मित्र प्रतिष्ठानचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजयकुमार जोशी, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान देवगड तालुका कार्यकारिणी सदस्य रमेश चव्हाण, नवजीवन ब्लड बँक कणकवलीच्या व्यवस्थापक सुप्रिया पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

सभापती गणेश राणे पुढे म्हणाले की, राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेत समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने रक्तदानासारखा जीवनदायी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. गटविकास अधिकारी निलेश जगताप , गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे यांनी स्वतः नावनोंदणी करून रक्तदात्यांना प्रोत्साहित केले. सुरुवातीला जवळपास ५६ जणांची नोंदणी झाली असून या उपक्रमासाठी पंचायत समितीतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेले सहकार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी पंचायत समिती सदस्य सदाशिव ओगले यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, अचानक उद्भवलेल्या आजारपणात किंवा अपघाताच्या प्रसंगी रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी रक्ताची आवश्यकता भासते. अनेकदा रक्तदानाचे आवाहन करूनही काहीजण पुढे येत नाहीत; मात्र स्वतःवर अशी वेळ आल्यावर रक्तदानाचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते. रक्तदानासारखे दुसरे पुण्य नसून पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमाबद्दल त्यांनी देवगड पंचायत समितीचे अभिनंदन केले.

या रक्तदान शिबिरात पंचायत समितीतील विविध विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, केंद्रप्रमुख, शिक्षकवृंद, ग्रामपंचायत अधिकारी तसेच ग्रामविकास अधिकारी अशा एकूण ५२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. विशेषतः देवगड शिक्षण विभागाने शिबिराच्या यशस्वीतेसाठी उल्लेखनीय सहकार्य केले.

यावेळी गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, सहाय्यक प्रशासन अधिकारी संतोष बिर्जे, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे विजयकुमार जोशी तसेच देवगड तालुका सदस्य रमेश चव्हाण यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल देवगड पंचायत समितीला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी योगदान देणारे सर्व अधिकारी, कर्मचारी, केंद्रप्रमुख, शिक्षकवृंद, ग्रामविकास अधिकारी व सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे सभापती गणेश राणे आणि उपसभापती अमोल लोके यांनी आभार व्यक्त केले.