चिपळूण (वार्ताहर) : गुणदे (ता. खेड) येथील सरस्वती शिक्षण संकुलात स्व. सुभाष सखाराम पवार (भावोजी) यांना शाळेच्या पहिल्या दिवशी भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शाळेच्या ज्ञानसाधना सभागृहात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेचा पहिला दिवस असल्याने सकाळी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आल्यानंतर मुलांना शासनाकडून देण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर दुपारी सरस्वती शिक्षण संस्थेच्या ज्ञानसाधना सभागृहात संस्था पदाधिकारी ग्रामस्थ, शिक्षक विद्यार्थी यांनी स्व. पवार भाऊजी यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी शिक्षकांमधून सौ, संसारे, श्री. देवकर, श्री. साळुंखे व सौ. विचारे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांमधून पंकजा, गार्गी व स्वरा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच ग्रामस्थांमधून ह.भ.प. परशुराम पोफळकर यांनी स्व. भाऊजींनी गुणदे गावात कलावती आईच्या माध्यमातून आध्यात्मिक वारसा चालू ठेवल्याचे सांगितले.
याप्रसंगी सरस्वती शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष भास्कर आंब्रे यांनी आमच्यावर असलेल्या एका बुजुर्ग व्यक्तीचा वचक आम्ही कायमचे हरवल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले. तर संचालक संजय आंब्रे यांनी भावना व्यक्त करताना माझे भाऊजी व एक मित्र हरपल्याचे सांगितले. सरस्वती शिक्षण संस्थेचे संचालक व पंचायत समितीचे सभापती सुनिल मोरे यांनी स्व. भाऊजींची उणीव कायम जाणवेल असे सांगितले. सहसचिव व शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र आंब्रे यांनी स्व. भाऊर्जीना आध्यात्माची साथ असल्यामुळे भाऊजींनी प्रत्येक संकटावर यशस्वीपणे मात केल्याचे सांगितले. संस्थेचे चेअरमन व अनुदत्त जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विक्रांत आंब्रे यांना बोलताना डोळ्यात अश्रू दाटून आले होते. अश्रृंना वाट मोकळी करून दिल्यानंतर आज पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने स्व. आण्णा व माईच्या नंतर घरातील एक वडिलतुल्य हक्काची व्यक्ती हरवल्याने झालेले नुकसान कधीच भरून निघणार नसल्याचे त्यांनी सांगितले. स्व. भाऊजी हे सरस्वती शिक्षण संकुलाचे आधारस्तंभ होते. भाऊजींचे नित्याचे भजन व किर्तन नेहमीच सर्वांना प्रेरणादायी होते. भाऊजी त्यांच्या आध्यात्मिक गुरु बेळगाव निवासी परमपूज्य कलावती आईच्या भजनात लीन असायचे. शेवटी सभागृहातील उपस्थितांकडून स्व. भाऊजींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी स्व. पवार भाऊजी यांच्या कन्या सौ. भक्ती बि. मोरे, जावई बिपिन मोरे, मानसपुत्र संदेश महामुणकर, आदेश महामुणकर, सौ. अमृता महामुणकर, सौ. श्रद्धा महामुणकर, सौ. उमा आंब्रे तसेच गुणदे गावचे ग्रामस्थ मनोहर आंब्रे, शिवाजी सावंत, सागर आंब्रे, राकेश कदम, सदगुरू काडसिद्धेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी जोशी, गुरुकुल विद्यामंदिरच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. अनिता विचारे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.












