गोव्यातील असोसिएशनच्या मनमानीमुळे सावंतवाडीतील चिरेखाण व्यवसाय संकटात

तोडगा न निघाल्यास वाहतूक रोखण्याचा संजू परब यांचा इशारा

खासदार नारायण राणे व आमदार निलेश राणे यांचीही भेट घेणार

सावंतवाडी । प्रतिनिधी :
गोव्यातील ‘पेडणे-बार्देश गोवा ट्रक ओनर्स असोसिएशन’च्या अन्यायकारक धोरणामुळे सावंतवाडी तालुक्यातील पारंपारिक चिरेखाण उत्खनन व विक्री व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. यामुळे स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे तसेच आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन व्यावसायिकांना न्याय मिळवून देणार, असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. तसेच, या विषयावर सकारात्मक तोडगा निघेपर्यंत तालुक्यातील ४० ही चिरेखाणीतून एकही गाडी गोव्यात जाणार नाही; आणि गोव्यातील वाळू, चिरे वाहतूक करणाऱ्या गाड्या सिंधुदुर्गात आल्यास त्याही रोखल्या जातील, असा थेट इशारा संजू परब यांनी दिला आहे.

 पत्रकार परिषदेत बोलताना संजू परब म्हणाले की, गोवा आणि सिंधुदुर्गचे संबंध नेहमीच चांगले राहिले असून ते अबाधित राहावेत हीच आमची इच्छा आहे. मात्र, गोव्यातील असोसिएशनच्या भूमिकेमुळे नाहक वाद निर्माण झालेत. आज चिरेखाण व्यावसायिकांना जीएसटी भरावा लागत असून डिझेलचे दरही वाढले आहेत, त्यामुळे त्यांना भाववाढ करणे भाग पडले आहे. असे असतानाही जिल्ह्यातील गाड्या गोव्यात घेतल्या जात नसून त्यांच्यावर अन्यायकारक बंधने घातली जात आहेत. याबाबत खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. तोपर्यंत जिल्ह्यातील इतर ठिकाणी जाणाऱ्या गाड्याही बंद ठेवण्यात येतील. लवकरच चिरेखाण व्यावसायिकांची आमदार निलेश राणे यांच्याशी भेट घडवून आणली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

​सावंतवाडी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर जांभा दगड शेजारील गोवा राज्यात विक्रीसाठी पाठवला जातो. मात्र, मागील दोन वर्षांपासून गोव्यातील पेडणे-बार्देश ट्रक ओनर्स असोसिएशनकडून महाराष्ट्रातील वाहनधारक आणि चिरेखाण व्यावसायिकांची प्रचंड पिळवणूक सुरू आहे. सर्व मालवाहनधारकांना गोव्याच्या संघटनेचा लोगो लावण्याची सक्ती केली जात आहे. गाड्या अडवून आर.टी.ओ., पोलीस आणि माईन्स डिपार्टमेंटमार्फत जाणीवपूर्वक कारवाई करण्यास भाग पाडले जात आहे. गोवा चेकपोस्टवर गाड्या अडवून त्या रिकाम्या करून घेणे आणि चालकांना धमकावणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. या मनमानीमुळे सध्या गोव्यातून येणाऱ्या आणि महाराष्ट्रातील सर्व गाड्या बंद पडल्याने येथील चिरेखाण व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.

एकीकडे गोव्यातील युनियनच्या जाचाला सामोरे जावे लागत असतानाच, दुसरीकडे शासकीय विभागांकडूनही स्थानिक चिरेखाण व्यवसायिकांची कोंडी केली जात आहे. हा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने यावर अवलंबून असणाऱ्या शेकडो कुटुंबांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. त्यामुळे गोवा युनियनच्या मनमानी कारभाराला चाप लावावा आणि प्रशासकीय पातळीवरील जाचक अटी शिथिल करून न्याय द्यावा, अशी मागणी चिरेखाण व्यवसायिकांनी केली आहे.

​या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, चिरेखाण व्यावसायिक संघाचे प्रकाश राऊत, अमित प्रभू, मदन सातोसकर, सुशिल कामटेकर, रंजन गावडे, प्रदिप मुळीक, दिगंबर कवठणकर, प्रविण बर्वे, गिरीश परब, राजेंद्र नाईक, गंगाराम मठकर, अजित कवठणकर आदींसह तालुक्यातील चिरेखाण व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.