बेपत्ता म्हणून नोंद असलेल्या व्यक्तीचा मृत्यू

देवगड / प्रतिनिधी

वाडा मूळबांध येथील प्रफुल्ल शांताराम जाधव (७८) यांचे १५ जून रोजी मुंबई येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते १८ मेपासून बेपत्ता होते. तपासादरम्यान त्यांचा मुंबई येथील एका रुग्णालयात आकस्मिक मृत्यू झाल्याची माहिती देवगड पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल जाधव हे वाडा मूळबांध येथे एकटेच राहत होते. त्यांचा मुलगा पारस हा कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहे. प्रफुल्ल जाधव यांच्यासाठी कालिचरण दास हे केअर टेकर म्हणून काम करीत होते. १८ मे रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास प्रफुल्ल जाधव यांनी दास यांच्याकडून ५०० रुपये घेतले व ते घरातून काहीही न सांगता निघून गेले. दरम्यान, ८ जून रोजी दास यांनी पारस जाधव यांना फोन करून प – फुल्ल जाधव हे मुंबई येथे तुमच्याकडे आले आहेत का, अशी विचारणा केली. मात्र, ते मुंबईत आले नसल्याचे पारस जाधव यांनी दास यांना सांगितले. त्यानंतर प्रफुल्ल जाधव हे बेपत्ता असल्याचे लक्षात आल्यानंतर पारस जाधव यांनी गावी येत वडिलांचा शोध घेतला. मात्र, त्यांचा कोणताही थांगपत्ता न लागल्याने पारस जाधव यांनी वडील प्रफुल्ल जाधव हे १८ मेपासून बेपत्ता असल्याची फिर्याद १२ जून रोजी सायंकाळी देवगड पोलीस स्थानकात दाखल केली. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आशिष कदम यांनी सुरू केला होता.

दरम्यान, प्रफुल्ल जाधव हे ७ जून रोजी मुंबई सीएसटी रेल्वे स्टेशनला तेथील पोलिसांना बेशुद्धावस्थेत आढळून आले. तेथील पोलिसांनी त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर काहीसे शुद्धीत आल्यानंतर प्रफुल्ल जाधव यांनी तेथे जबाब नोंदविण्यासाठी आलेल्या पोलिसांसमोर स्वतःच्या पत्त्याचे ठिकाण सांगताना ‘बागेश्वर मंदिर, देवगड’ असा उच्चार केला. त्या पोलिसांमधील एक कर्मचारी मूळचा देवगड- पडेल येथील होता. त्या पोलीस कर्मचाऱ्याने पडेल येथील आपल्या मित्राला देवगड येथे बागेश्वर मंदिर कोठे आहे, याबाबत विचारणा केली. त्या मित्राने बागेश्वर मंदिर हे वाडा मूळबांध येथे असल्याचे सांगितले. यावर मुंबईतील त्या पोलीस कर्मचाऱ्याने वाडा येथील पोलीस पाटीलांमार्फत देवगड पोलिसांशी संपर्क साधला. परंतु याचदरम्यान १५ जून रोजी प्रफुल्ल जाधव यांचे सदर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. देवगड पोलिसांनी सदर बेपत्ता वृद्धाची माहिती मुंबई पोलिसांना दिल्यानंतर प्रफुल्ल जाधव यांची ओळख त्यांचा मुलगा पारस जाधव यांच्यामार्फत पटविण्यात आली. नातेवाईकांनी मुंबई येथे जात प्रफुल्ल जाधव यांचे पार्थिव ताब्यात घेतले. मुंबई देवनार येथे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.