शाहू महाराजांचे कार्य आजही समाजाला दिशादर्शक : संभाजी साटम

कर्ले महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहु महाराज जयंती

शिरगाव (प्रतिनिधी) :            शिक्षण, आरक्षण आणि सामाजिक सुधारणांमुळे महाराष्ट्राला पुरोगामी दिशा मिळाली. सामाजिक समतेचे महामेरू असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत. त्यांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले तसेच २६ जुलै १९०२ रोजी मागासवर्गीयांसाठी ५० टक्के आरक्षणाची ऐतिहासिक घोषणा केली. अस्पृश्यता निर्मूलन, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, शेतकरी व कला क्षेत्राला दिलेले प्रोत्साहन यामुळे त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या समतेच्या विचारांवर चालणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे उपाध्यक्ष संभाजी साटम यांनी केले.

देवगड तालुक्यातील शिरगाव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना साटम यांनी शाहू महाराजांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आरक्षणविषयक कार्याचा आढावा घेतला. जयंतीनिमित्त महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

यावेळी प्राचार्य समीर तारी, ॲकॅडमिक समन्वयक प्रा. सिद्धी कदम, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुगंधा पवार, सहाय्यक सोनाली ताम्हणकर, आशय सावंत, अक्षता मोंडकर, कोमल पाटील, सोनल नाईक, अजय चव्हाण, दीक्षा गरुड तसेच शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.