खेड (प्रतिनिधी) : महिलांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देत त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने खेड नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “महिलांचा विविध कला गुणदर्शन सोहळा २०२६” उत्साहपूर्ण आणि जल्लोषमय वातावरणात संपन्न झाला. खेड शहरातील महिला कलाकारांनी नृत्य, गायन, सांस्कृतिक सादरीकरण आणि विविध कलाविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या सौभाग्यवती सौ. ज्योती रामदास कदम, सौ. अनिता अरुण कदम तसेच खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष माधवी बुटाला यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या कलागुणांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे महिलांना स्वतःची कला सादर करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ मिळत असल्याचे सांगितले. महिलांनी विविध क्षेत्रांत पुढे येण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असून नगरपरिषद अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देत राहील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रसिका खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, नगरसेविका आरती पवार, रेश्मा खतीब, वैभवी खेडेकर, नीता आंब्रे, स्वप्नाली चव्हाण, दिप्ती शिगवण, पंचायत समिती सदस्य कासार मॅडम, नगरसेवक प्रेमळ चिखले, शिवसेना शहर प्रमुख कुंदन सातपुते, शिवसेना खेड शहर महिला संघटिका नेहा दळी, युवा सेना जिल्हाप्रमुख दर्शन महाजन, युवा सेना शहर संघटक मयुरेश दरेकर, संपदा गुजराथी, अश्विनी वडके, नूतन सावंत, श्रेया जोशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात महिलांनी सादर केलेल्या नृत्य, गायन, पारंपरिक आणि आधुनिक सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रत्येक सादरीकरणातून महिलांच्या कलात्मकतेची आणि आत्मविश्वासाची झलक पाहायला मिळाली. या कार्यक्रमामुळे अनेक महिला कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली असून त्यांच्या सुप्त कलागुणांना नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला खेड शहरातील नागरिक, महिला कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला व बालकल्याण समितीच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले असून भविष्यातही महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने आयोजित करण्यात यावेत, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.









