रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सुभद्राबाई शिक्षण निधीची शिष्यवृत्ती; १ जुलैपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात

१ जुलैपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात

राजापूर (वार्ताहर): रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या व दहावी परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढील कोणत्याही सरकारमान्य अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या गरजू व होतकरू विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मुंबईच्या ‘सुभद्राबाई शिक्षण निधी’ या संस्थेतर्फे शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.
या शिष्यवृत्तीसाठी कोणत्याही प्रकारची जातीधर्माची बंधने किंवा विशिष्ट गुणांची अट ठेवण्यात आलेली नाही. तसेच गरजू शैक्षणिक संस्थांनाही त्यांच्या आवश्यकतेनुसार संस्थेकडून मदत केली जाते.
वर्ष २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी आणि संस्थांनी आपले अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचे आहेत. संस्थेच्या www.subhadrabaishikshannidhi.com या अधिकृत संकेतस्थळावर १ जुलै २०२६ पासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. प्रत्यक्ष कागदपत्रे किंवा ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. संकेतस्थळावरील माहितीपत्रक पाहून त्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२६ ही असून, या मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही, अशी माहिती सुभद्राबाई शिक्षण निधी, मुंबई या संस्थेचे चिटणीस सुभाष कुळकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.