पहिल्याच पावसात फाउंडेशनखालची माती गेली वाहून
चिपळुणात पावसाचा जोर!
चिपळूण (प्रतिनिधी) : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होतो. मात्र, यावर्षी जून महिना कोरडा गेला. अखेर जून महिना संपता-संपता पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन-चार दिवसांपासून चांगलाच पाऊस पडत असून चिपळूणमध्ये शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात घाट संरक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या गॅबियन वॉलला पहिल्याच मुसळधार पावसात धोका निर्माण झाला आहे. सततच्या पावसामुळे गॅबियन वॉलच्या फाउंडेशनखालची माती वाहून गेल्याने भिंतीचा पाया कमकुवत झाला असून भिंत कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे परशुराम घाट वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित कधी होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणावेळी परशुराम घाटात मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले होते. काही ठिकाणी भराव टाकून रस्त्याची उंची वाढवण्यात आली. त्यानंतर घाट आणि महामार्ग सुरक्षित राहावा तसेच दरडी कोसळण्याचा धोका कमी व्हावा म्हणून या ठिकाणी गॅबियन वॉल उभारण्यात आली होती. परशुराम घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पेढे-परशुराम परिसरात वारंवार दरडी कोसळतात. या दरडी दळवीत गावाच्या दिशेने येऊन झाडे आणि परिसराचे नुकसान करतात. त्यामुळे गाव आणि मुंबई-गोवा महामार्गाचे संरक्षण करण्यासाठी ही गॅबियन वॉल महत्त्वाची मानली जाते. मात्र, पहिल्याच जोरदार पावसात गॅबियन वॉलच्या फाउंडेशनखालची माती वाहून गेल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे भिंतीच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कामाच्या दर्जाबाबतही सवाल उपस्थित होत आहेत. घाट संरक्षणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला असताना पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाच्या कामकाजावर आणि संबंधित यंत्रणांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. आत्ताच पाऊस सुरू झाला असल्याने ही परिस्थिती उद्भवल्याने पावसाळा अजून किमान तीन महिने पडणार असल्याने गॅबियन वॊलच्या सुरक्षितेच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
चौकट-
गेली अनेक वर्ष जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडतो. मात्र, यावर्षी जून महिना कोरडा गेल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. दरम्यान, जूनच्या शेवटच्या दोन दिवस अगोदर पावसाला सुरुवात झाली आणि गेल्या दोन चार दिवसांपासून पावसाचा चांगलाच जोर आहे यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे दिनांक एक जुलै रोजी ९३.८८ मि. मी. पाऊस पडल्याची तर एकूण ४४८.५१ मि. मी. आजपर्यंत १२.६५ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर आत्तापर्यंत कुठेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.













