अतिवृष्टी व पुरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राजापूर नगरपरिषद अलर्ट मोडवर

नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षाचे २४ तास काम
प्रशासकिय अधिकारी यांसह नगराध्यक्षांसह नगरसेवकही तत्पर
रविवारच्या पुरानंतर सोमवारी धडक स्वच्छता मोहिम
राजापूर प्रतिनिधी : गेले आठवडा भर संततधार पडणारा पाऊस, रविवारी शहरात निर्माण झालेली पुरपरिस्थिती यानंतर नगर परिषद प्रशासन अलर्ट मोडवर आहे. अतिवृष्टी काळात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी राजापूर नगरपरिषदेने कंबर कसली आहे. नगरपरिषदेच्या वतीने “नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष” कार्यान्वित करण्यात आला असून नागरिकांच्या मदतीसाठी संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत.
तर रविवारच्या पुरानंतर सोमवारी सकाळीच नगर परिषद प्रशासनाने तात्काळ शहरात स्वच्छता मोहिम राबवून शहर स्वच्छ केले असून शहरासह विविध प्रभागातही स्वच्छतेकडें विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. नगराध्यक्षा एड. हुसनबानू खलिफे यांसह सर्व नगरसेवकही शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून असून शहर वासीयांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सातत्याने प्रशासनाच्या सपर्कात आहेत.
राजापूरचे उपविभगिय अधिकारी विश्वजीत गाताडे, तहसीलदार विकास गंबरे आणि पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याकडे प्रशासक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून मुख्याधिकारी अभिजीत कुंभार आणि कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव काम पाहणार आहेत. नगर परिषदेकडून आपत्ती काळात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी नियंत्रण कक्षाचे फोन क्रमांक: ०२३५३-२०३१ / १३०१५१७१ अग्निशमन: ०२३५३-२२२०३१ / ९८२२२३०५१७ / १३५१७५०७२६ जारी करण्यात आले आहेत.
नगरपरिषदेची आपत्ती व्यवस्थापनासाठी ७ पथके तयार
आपत्ती व्यवस्थापनासाठी नगर परिषदेने सात पथके तयार केली असून यामध्ये पथक १ स्थायत्य अभियंता रणवीर कोकरे-देसाई यांच्या नेतृत्वाखाली. पावसात पडणारी धोकादायक झाडे तोडणे, रस्ते मोकळे करणे आणि अवजारे सज्ज ठेवणे ही कामे. पथक २: योगेश बंडगर आणि अजिंक्य कांबळे. धोकादायक इमारतींवर कारवाई, पूरग्रस्तांचे स्थलांतर आणि निवाऱ्याची व्यवस्था पाहतील, पथक ३: स्वच्छता अभियंता सुप्रिया पोतदार. आरोग्य, औषधे आणि वैद्यकीय सेवा पुरवण्याची जबाबदारी. पथक ४: स्वच्छता निरीक्षक अमित पोवार यांच्या नेतृत्वाखालील हे सर्वात महत्वाचे पथक. पूर आल्यास बोट, लाईफ जॅकेट, दोऱ्या यांची व्यवस्था करणे, बचाव कार्य करणे आणि घटनास्थळी तात्काळ पोहोचणे. पथक ५ ते ७: समन्वय, पत्रव्यवहार, पाणीपुरवठा आणि वीज गेल्यास पर्यायी व्यवस्था पाहतील असे निश्चित करण्यात आले आहे.
पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदतीसाठी खालील साहित्य उपलब्ध ठेवण्यात आले आहे. यामध्ये मोठी होडी-०२, नायलॉन रस्सी-०२, बॅल-०२, लाईफ जॅकेट-१०, बाय रिंग-०७ – बोट क्र. १: चालक सुशील यादव – जवाहर चौक ते नवजीवन कॉलेज – बोट क्र. २: चालक दिनेश पवार – जवाहर चौक ते बाजारपेठ आणि परिसर असे नियोजन करण्यात आले आहे.
शहरात पुराचे पाणी शिरण्याची शक्यता असल्यास व पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यास ३ इशारे देण्यात येणार आहेत. अर्जुना नदीच्या पाणी पातळीनुसार नागरिकांना इशारा देण्यात येणार आहे: ५ मीटर पाणी झाल्यास – १ वेळा भोंगा इशारा, ६ मीटर पाणी झाल्यास – २ वेळा भोंगा ईशारा धोका ८ मीटर पाणी जवाहर चौक गणेश घाटावर आल्यास – ३ वेळा भोंगा ईशारा धोका. यावेळी सायरनही वाजवण्यात येणार आहे. पाणी पातळी ७ मीटर झाली की पूरग्रस्त भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्याची कारवाई पथक क्र. २ कडून केली जाणार आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन नगरपरिषद प्रशासानाने नागरिकांना केले आहे.