वादळी पावसाचा वैभववाडी तालुक्याला तडाखा

झाड पडल्याने वैभववाडी–उंबर्डे मार्गावरील वाहतूक ठप्प ; दोन घरांचे मोठे नुकसान

वैभववाडी प्रतिनिधी :
वैभववाडी तालुक्यात सोमवारी दुपारी झालेल्या जोरदार वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. वैभववाडी–उंबर्डे मार्गावर झाड कोसळल्याने सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली. तर कुंभवडे येथे एक घर कोसळून मोठे नुकसान झाले आणि वाभवे येथे घरावर झाड पडल्याने नुकसान झाले. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रविवारी सकाळी ८ ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत तालुक्यात ८० मिमी पावसाची नोंद झाली. सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यावेळी वैभववाडी–उंबर्डे मार्गावर मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद झाली. झाड वीजवाहिनीवर पडल्यामुळे परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला.

घटनेनंतर वाहनचालक, ग्रामस्थ आणि संबंधित यंत्रणांनी तत्काळ झाड हटविण्याचे काम हाती घेतले. सुरुवातीला एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण झाड हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. नुकसानग्रस्त वीजखांब दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम महावितरणकडून सुरू करण्यात आले.

दरम्यान, कुंभवडे येथील हरिश्चंद्र राऊत यांचे घर मुसळधार पावसामुळे कोसळून मोठे नुकसान झाले. तसेच वाभवे येथील उमेश अनंत गावडे यांच्या घरावर झाड कोसळल्याने घराचे नुकसान झाले. वाभवे आणि नाधवडे येथे वीजखांबही जमीनदोस्त झाल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणने वीजयंत्रणा सक्षम करून अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत करूळ व भुईबावडा घाटांवरील वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती.