‘शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे पुरस्काराने’ गौरव
चिपळूण (प्रतिनिधी) : जिद्द, सातत्यपूर्ण परिश्रम, शिक्षणाविषयीची निष्ठा आणि आई-वडिलांकडून लाभलेले मूल्यसंस्कार यांच्या बळावर शिक्षिका स्वप्नाली जोशी यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम. लिब. अँड इन्फॉर्मेशन सायन्स (M.Lib. & I.Sc.) पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल विद्यापीठाच्या वतीने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
विद्यापीठाच्या ३७ व्या वर्धापनदिनानिमित्त १ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या पारितोषिक वितरण समारंभात कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे आणि प्र-कुलगुरू प्रा. जोगिंदर विसेन यांच्या हस्ते स्वप्नाली जोशी यांना रोख २,००१ रूपये, मानपत्र, सन्मानचिन्ह तसेच विद्यापीठाचा प्रतिष्ठेचा ‘शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विविध अभ्यासक्रमांतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. स्वप्नाली जोशी यांनी बाळासाहेब धुरी अध्यापक महाविद्यालय यांच्या माध्यमातून श्रीराममंदिर वाचनालय, सावंतवाडी येथील अभ्यासकेंद्रात प्रवेश घेऊन एम. लिब. अँड इन्फॉर्मेशन सायन्सचे शिक्षण पूर्ण केले. अध्यापनाची जबाबदारी सांभाळत उच्च शिक्षण पूर्ण करणे हे आव्हान त्यांनी समर्थपणे पेलले. वेळेचे योग्य नियोजन, नियमित अभ्यास आणि प्रामाणिक प्रयत्न यांच्या जोरावर त्यांनी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या या यशामागे शिक्षक असलेल्या आई-वडिलांनी दिलेले शिक्षणप्रेम, शिस्त, प्रामाणिकपणा आणि परिश्रमाचे संस्कार हेच सर्वात मोठे बळ ठरले. लहानपणापासूनच शिक्षण हीच खरी संपत्ती असल्याची शिकवण त्यांनी घरातून घेतली. या मूल्यांमुळेच प्रत्येक टप्प्यावर उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याची प्रेरणा मिळाल्याचे स्वप्नाली जोशी यांनी सांगितले. कुटुंबीयांचे सहकार्यही त्यांच्या यशातील महत्त्वाचा आधार ठरले. विशेषतः त्यांचा लाडका मुलगा मिहीर हा त्यांच्या आयुष्यातील प्रेरणेचा स्रोत असून, त्याच्या निरागस हास्याने आणि प्रेमाने प्रत्येक आव्हान स्वीकारण्याचे बळ मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शिक्षण, नोकरी आणि कुटुंब यांचा समतोल साधत त्यांनी मिळवलेले हे यश अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विशेष म्हणजे, शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ध्येय फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने सन २०२६ चा ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’ देऊनही स्वप्नाली जोशी यांचा गौरव करण्यात आला आहे. अध्यापनातील नावीन्य, विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्यामुळे त्यांना हा सन्मान प्राप्त झाला.
स्वप्नाली जोशी यांच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्यापीठात प्रथम क्रमांक, ‘शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे पुरस्कार’ आणि ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’ या सन्मानांमुळे त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे. त्यांच्या या यशामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि विशेषतः अध्यापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांना नवी प्रेरणा मिळत आहे.













