बेजबाबदार उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांना नासीर काझी यांनी खडसावले : भर पावसात अधिकाऱ्यांना फुटला घाम
कार्यकारी अभियंत्यांच्या आश्वासनानंतर अखेर आंदोलन स्थगित
वैभववाडी l प्रतिनिधी : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात तिथवली परिसरातील ग्रामस्थांनी बुधवारी वैभववाडी येथील वीज वितरण कार्यालयावर धडक देत तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले. अर्धवट उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर माजी सभापती नासीर काझी चांगलेच संतापले. तिथवली भागातील वीज वितरणचे प्रलंबित विषय मार्गी लागत नाही. तोपर्यंत कार्यालय सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा नासीर काझी यांनी घेतल्याने वातावरण तणावाचे झाले. काझी यांनी उपस्थित अधिकारी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत भरपावसात अधिकाऱ्यांना घाम फोडला. जोपर्यंत तुमचे वरिष्ठ अधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा सर्व आंदोलनकर्त्यांनी घेतला. अखेर दुपारी ३. ३० वाजता वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता जयंतीलाल भांबरे यांनी वैभववाडी येथे येऊन आंदोलकांशी चर्चा करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केली जाईल. असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
गेले काही दिवस तिथवली व तिथवली परिसरातील गावातील वीज पुरवठा वारंवार खंडित होतं आहे. यामुळे वीज ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. वीज वारंवार खंडित होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेती पंपांवरही त्याचा परिणाम होत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नव्हती.
त्यामुळे तिथवली परिसरातील ग्रामस्थांनी माजी सभापती नासीर काझी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारी ११. ४५ वाजता वैभववाडी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. मात्र स्थानिक वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांकडून ग्रामस्थांना समाधानकारक उत्तरे मिळाले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ अधिक संतप्त झाले. त्यांनी जोपर्यंत वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता येथे येत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा इशारा दिला. अखेर सायंकाळी साडेतीन वाजता वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री भांबरे हे आंदोलन स्थळी आले. त्यांनी आंदोलन कर्त्या ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी कार्यकारी अभियंता समोरच वीज वितरण कंपनीच्या कारभाराचे आंदोलकांनी वाभाडे काढले.
वैभववाडीचे उपाभियंता श्री चव्हाण यांची बदली होऊन महिना झाला तरी त्यांच्या जागेवर दुसरे अभियंता आलेले नाही. जर बदली झालेले अधिकारी येथे आले नाही तर त्यांना का सोडले? असा प्रश्न सभापती सिद्धेश रावराणे यांनी केला. तर लवकरच त्यांच्या जागी नवीन अधिकारी हजर होतील. असे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले.
तसेच जे वायरमन योग्य पद्धतीने काम करत नसतील लोकांशी उद्धट वागत असतील अशांना नोटीस काढा, जर ऐकत नसतील तर त्यांना कामावरून काढून टाका असे आदेश कार्यकारी अभियंता यांनी दिले.
भुईबवाडा विभागात जीर्ण वीज खांब, जीर्ण वीज वहिण्या आहेत. यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.अपघात घडून जीवितहानी होण्याची वाट पाहता काय? असा सवाल नासीर काझी केला.
पावसाळ्यापूर्वी करायची कामे जर केली असती तर हा प्रश्न आला नसता. त्यामुळे तातडीने वीज वाहिनीवरील झाडे तोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
खारेपाटण विभागातील शर्पे येथून तिथवली लाईन आलेली आहे. या विभागात काही प्रॉब्लेम झाला तर त्या लाईन वरून तिथवली विभागातील गावांना वीज पुरवठा करता येईल त्या दृष्टीने मागणी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप काझी यांनी केला. तातडीने सर्वे करून त्याचा अहवाल पुढच्या मीटिंगमध्ये देण्याची सूचना कार्यकारी अभियंत्यांनी कनिष्ठ अभियंता यांना केली. यावेळी पंचायत समिती सदस्य सुवर्णा संसारे, महेश संसारे, इब्राहिम काझी, जयराज हरयाण,
महादेव हरयाण, ओंकार हरयाण, अनिकेत कुडतरकर, मजीद सोलकर, रोहिण कुडाळकर, विजय कुडतरकर, अनिल हरयाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.













