कुडाळ नगरपंचायतीतील कथित गैरव्यवहारांवरून नगरसेविका संध्या तेरसे आक्रमक

चौकशी व कारवाईच्या मागणीसाठी उपोषणाचा इशारा

कुडाळ :कुडाळ नगरपंचायतीत झालेल्या कथित गैरव्यवहारांची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ. संध्या प्रसाद तेरसे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, शुक्रवार दि. १० जुलैपासून नगरपंचायत कार्यालयासमोर शांततामय उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी मुख्याधिकारी, कुडाळ नगरपंचायत यांना दिले असून त्याच्या प्रती प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक, कुडाळ यांनाही सादर करण्यात आल्या आहेत.

निवेदनात सौ. तेरसे यांनी म्हटले आहे की, कुडाळ नगरपंचायतीत झालेल्या कथित गैरव्यवहारांबाबत त्यांनी दि. २ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून सखोल चौकशी व संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यासाठी प्रशासनाला १० जुलैपर्यंतचा अवधी देण्यात आला होता. मात्र, अद्याप कोणतीही ठोस चौकशी अथवा कारवाई झाल्याचे दिसून आलेले नसल्याने लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या हितासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शुक्रवार, दि. १० जुलै रोजी सकाळी ९ वाजल्यापासून कुडाळ नगरपंचायत कार्यालयासमोर हे शांततामय उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

नगरसेविकेने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे कुडाळ नगरपंचायतीतील कथित गैरव्यवहारांचा मुद्दा ऐरणीवर आला असून, प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते आणि चौकशीची प्रक्रिया गतीमान होते का, याकडे आता नागरिकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.