सामाजिक दायित्वच्या भूमिकेतून घरडा केमिकल्स कडून १० संगणक भेट

चिपळूण (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नामांकित औद्योगिक संस्था घरडा केमिकल्स, लोटे उत्पादनाबरोबरच मानवतेच्या सामाजिक दायित्वासाठी नेहमीच पुढारलेली असते. कंपनीच्या या सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय मार्गताम्हणे या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ई-ग्रंथालय या योजनेअंतर्गत १० संगणक संच भेट देण्यात आले.
या कार्यक्रमास घरडा केमिकल्स लिमिटेड लोटेचे व्यवस्थापक बापूराव पवार, मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व माजी आमदार मधुकर चव्हाण, उपाध्यक्ष, सर्व संचालक पदाधिकारी, प्राचार्य डॉ. बाळासाहेब यादव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्राचार्य डॉ. बाळासाहेब यादव यांनी राष्ट्रीय शिक्षण नीतीमध्ये संगणक आधारित शिक्षणाचे वाढते महत्त्व अधोरेखित करून सध्या ए.आय.टूल्स, विविध संगणकीय कौशल्यांची रोजगार मिळवण्यामध्ये असणारे महत्त्व याबद्दल माहिती देत महाविद्यालयांमध्ये सुरू झालेल्या विविध कोर्सेसची माहिती दिली. घरडा केमिकल्स लिमिटेड लोटेचे व्यवस्थापक बापूराव पवार यांनी सध्या आधुनिक युगामध्ये संगणक आधारित शिक्षण व्यवस्थेचे महत्त्व जाणणाऱ्या आपल्या घरडा केमिकल्स या कंपनीच्या सेवाभावी वृत्तीबद्दल आदर व्यक्त करीत मार्गताम्हणे व आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देणाऱ्या मार्गताम्हणे एज्युकेशन सोसायटीच्या सेवाभावी वृत्तीबद्दल गौरवोद्गार काढले. अधिकाधिक रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी संगणकीय ज्ञानाचे असणारे महत्त्व ओळखत असल्याने कंपनीच्या सीएसआर फंडामार्फत आतापर्यंत महाविद्यालयास १५ संगणक दिल्याबद्दल कंपनीच्या व्यवस्थानाबद्दल आदर व्यक्त केला. मार्गताम्हणे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर चव्हाण यांनी घरडा कंपनीच्या सेवाभावी वृत्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत प्रत्येक विद्यार्थ्याने काळाची पावले ओळखत संगणकीय शिक्षण घेण्याबद्दलचे महत्व पटवून दिले. महाविद्यालयामार्फत आयोजित केलेल्या कोर्सेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुरेश सुतार यांनी तर आभार प्रा. शाहरुख चौगले यांनी मानले. कार्यक्रमास घरडा केमिकल्सचे कंप्यूटर हार्डवेअर इंजिनियर नितीन आरमरे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.