कुटुंबातील महिलेला सन्मान न देणारे समाजातील महिलांचा काय सन्मान करणार?

विनायक राऊतांच्या सुनेच्या छळवणुकीविरोधात सावंतवाडी भाजप महिला मोर्चा आक्रमक

गिरीश राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी

संबंधित महिलेस न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरुच ठेवणार 

सावंतवाडी: प्रतिनिधी : जो व्यक्ती आपल्या हक्काच्या कुटुंबातील महिलेला सन्मान देऊ शकत नाही, तो समाजातील इतर महिलांचा सन्मान काय करणार? असा घणाघाती सवाल उपस्थित करत भाजप महिला मोर्चाने विनायक राऊत यांचे चिरंजीव गिरीश राऊत यांचे नगरसेवक पद तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.

सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दुटप्पी भूमिकेवर कडाडून टीका केली. महिलांच्या प्रश्नांवर आणि हक्कांवर नेहमीच मोठ्या बाता मारणाऱ्या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आता स्वतःच्याच नेत्याच्या घरात छळ सोसत असलेल्या पीडित महिलेच्या बाबतीत गप्प का आहेत, असा थेट सवाल मडगावकर यांनी विचारला.

माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात त्यांची सून गिरिजा राऊत यांनी केलेल्या छळवणुकीच्या गंभीर आरोपांनंतर आता सिंधुदुर्गातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे. या प्रकरणावरून सावंतवाडी भाजप महिला मोर्चा अत्यंत आक्रमक झाला असून, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विनायक राऊत व त्यांच्या कुटुंबीयांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

महिलांच्या हक्कांसाठी नेहमी पुढे येणाऱ्या आता या प्रकरणात संबंधित महिलेच्या पाठीशी का उभ्या राहत नाहीत? त्यांची ही भूमिका संशयास्पद आहे, असा टोला त्यांनी लगावला.

भाजप महिला मोर्चा गिरिजा राऊत यांच्या पाठीशी खडकासारखा ठामपणे उभा असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आवश्यक ती प्रत्येक लढाई लढणार असल्याचे मोहिनी माडगावकर यांनी स्पष्ट केले.

या लढ्याला अधिक तीव्र करण्यासाठी ह्युमन राईट्स (मानवाधिकार) संस्थेच्या माध्यमातूनही आवाज उठविला जाईल आणि संबंधित महिलेस न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच ठेवला जाईल, असा इशारा महिला मोर्चाने दिला आहे.

हे प्रकरण केवळ इथपर्यंतच मर्यादित न ठेवता, पीडित गिरिजा राऊत यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्याचे पालकमंत्री नितेश राणे तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली जाईल आणि या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केला जाईल, अशी ठाम भूमिका यावेळी पदाधिकाऱ्यांनी मांडली.

या पत्रकार परिषदेला सावंतवाडी भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांच्यासह उपाध्यक्षा ज्योती मुद्राळे, सरचिटणीस मेघना साळगावकर, चिटणीस मेघा भोगटे, तसेच अन्वी मेस्त्री, साक्षी गावस आणि इतर अनेक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्व उपस्थितांनी विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबाच्या या कृत्याचा जोरदार निषेध नोंदवला.