लांजा (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोट येथील जिल्हा परिषद शाळा कोट नं. ४ च्या विद्यार्थ्यांनी रवींद्र पाष्टे
यांच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या भात लावणी उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग होत, शेतात उतरून विद्यार्थ्यांनी भाताची रोपे लावत शेतीचे महत्त्व आणि शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव अनुभवली.
जागतिक युवा कौशल्य दिन हे तरुणांच्या सशक्तीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. म्हणून या जागतिक युवा दिनानिमित्त लांजा तालुक्यातील कोट मधील शाळा कोट नं ४ चे मुख्याध्यापक श्री. भागवत आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या शेजारी असलेले ग्रामस्थ रविंद्र पाष्टे यांच्या शेतामध्ये भात लावणी च्या उपक्रमात सहभाग घेतला
उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना भात लागवडीची पद्धत, रोपांची योग्य अंतरावर लागवड, पाणी व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आनंदाने श्रमदान करत शेतीविषयी आत्मीयता आणि निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ केले.
शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, सहकार्याची भावना आणि कृषी संस्कृतीबद्दल आदर निर्माण झाला. या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक वर्ग यांनी मनापासून कौतुक केले.











