चिपळूण (प्रतिनिधी) : किशोरवयीन विद्यार्थिनींच्या आरोग्य, स्वच्छता आणि सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या फुलराणी कक्षाचे उद्घाटन सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम यांच्या हस्ते संपन्न झाले.
माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी व अनुसया महिला बचत गट, रत्नागिरी यांच्या देणगीतून प्राप्त साहित्याच्या माध्यमातून हा सुसज्ज फुलराणी कक्ष विद्यालयात उभारण्यात आला आहे. विद्यार्थिनींना सुरक्षित, आरोग्यदायी आणि सन्मानपूर्वक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. प्रारंभी प्राचार्य राजेंद्र वारे यांनी उपस्थित मान्यवर, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, संस्थेचे सचिव महेश महाडिक, ज्येष्ठ संचालक शांताराम खानविलकर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी शिक्षिका सौ. जाधव यांनी फुलराणी कक्षाची आवश्यकता, किशोरवयीन मुलींना भेडसावणाऱ्या विविध समस्या तसेच या कक्षामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या साहित्याचा विद्यार्थिनींना होणारा उपयोग याविषयी माहिती दिली. संस्थेचे सचिव महेश महाडिक यांनी संस्थेच्या वतीने या कक्षास पूरक अशा स्वच्छतागृह व स्नानगृहाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. कक्षामध्ये आवश्यक साहित्य, स्वच्छता, गोपनीयता आणि नियमित मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली असून विद्यार्थिनींना त्याचा मोठा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. संस्थेचे ज्येष्ठ संचालक शांताराम खानविलकर यांनी मनोगतात विद्यार्थ्यांच्या बदलत्या गरजा ओळखून अशा सुविधा प्रत्येक शाळेत निर्माण होणे काळाची गरज असल्याचे सांगितले. गोविंदराव निकम विद्यालयाने उभारलेला फुलराणी कक्ष विद्यार्थिनींसाठी निश्चितच उपयुक्त व प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमास उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक महेश कुलकर्णी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. विद्यार्थिनींच्या आरोग्य, स्वच्छता, आत्मविश्वास आणि सन्मानपूर्ण शैक्षणिक वातावरणासाठी उभारण्यात आलेला फुलराणी कक्ष हा विद्यालयाच्या विद्यार्थीहितैषी उपक्रमांमध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.













