शेतकऱ्यांना त्रास दिलात तर याद राखा

पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना सभापती सिद्धेश रावराणे यांनी भरला सज्जड दम

वैभववाडी पं सं. ची मासिक सभा संपन्न

वैभववाडी | प्रतिनिधी :     ऊसशेतीसह आंबा, काजू बागायतदारांची संख्या तालुक्यात मोठी आहे. जिल्हा कृषी विकासात वैभववाडी तालुक्याचे मोठे योगदान आहे. मग वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांची तालुक्याकडे पाठ का? किती अधिकारी बांधावर गेले. असा सवाल सभापती सिद्धेश रावराणे यांनी यांनी केला. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या जनावरांचे पंचनामे वेळेत होत नाहीत. शेतकऱ्यांना नाहक त्रास पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून होत आहे. शेतकऱ्यांना त्रास दिलात तर गाठ माझ्याशी आहे. असा सज्जड दम सिद्धेश रावराणे यांनी अधिकाऱ्यांना दिला.
वैभववाडी तालूका पंचायत समिती मासिक सभा सभापती सिद्देश रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती साची कोलते, सदस्य सुवर्णा संसारे, मंगेश लोके, देवानंद पालांडे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ व खातेप्रमुख उपस्थित होते.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात काही शेतकऱ्यांची जनावरे मृत झाली आहेत. परंतु त्यांना भरपाई मिळाली नाही. असा मुद्दा सभेत उपस्थित झाला. यावर वनविभागाने पशुसंवर्धन विभागाकडून मृत जनावरांचा पंचनामा वेळेत होत नसल्याचे सांगितले. यावर सभापती रावराणे आक्रमक झाले. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पंचनाम्यासाठी अधिकारी शेतकऱ्यांकडून पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले. तर अशा अधिकाऱ्यांची खैर नाही. असे पालांडे यांनी सुनावले.
तालूका कृषी विभाग जर एवढे काम करतो तर मग कृषी मेळाव्याला शेतकरी उपस्थित का नव्हते? असा सवाल सदस्य देवानंद पालांडे यांनी केला. फक्त मासिक सभेत अहवाल वाचून काय उपयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहचा अशा सूचना पालांडे यांनी केल्या.
एकीकडे स्मार्ट मीटरची सक्ती नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मग तालुक्यात स्मार्ट मीटर बसवण्याची वीज वितरण कंपनीकडून सक्ती केली जात आहे हे योग्य नाही. असे देवानंद पालांडे यांनी सांगितले. तर तुम्ही संबंधित ग्राहकाच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू शकत नाही. स्मार्ट मीटर च्या बाबतीत वीज वितरण कंपनीने मनमानी केल्यास मोर्चा काढावा लागेल असा इशारा मंगेश लोके यांनी दिला.
तर स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी संबंधित तिन्ही कंपन्यांचे अधिकारी व कार्यकारी अभियंता यांच्या समवेत एका बैठकीचे आयोजन करावे. या बैठकीत ग्राहकांच्या स्मार्ट मीटर संबंधातील ज्या अडचणी आहेत. त्यावर चर्चा करू. असे सभापती रावराणे यांनी वीज वितरणचे कनिष्ठ अभियंता यांना सांगितले.

फोंडा – उंबर्डे राज्य मार्गावर खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे होतं आहे. जर असे काम करणार असाल तर करू नका. यावर अधिकारी यांनी कामाचा दर्जा चांगला असल्याचे सांगितले. मिटिंग संपल्यावर कामांची पाहणी करूया. जर काम निकृष्ट दर्जाचे झाले असेल तर तुम्ही संबंधितावर कारवाई करणार का? असा प्रश्न सभापती रावराणे यांनी केला.
सध्या रस्त्याच्या दूतर्फ झाडे लावली जात आहेत. ती अगदी रस्त्यालगत लावली जात आहेत. हे योग्य आहे का? असा सवाल रावराणे यांनी अधिकाऱ्यांना केला. झाडी तोडताना रस्त्यावर आलेली झाडी व धोकादायक झाडे तोडा. सरळ झाडे तोडू नये अशी सूचना मंगेश लोके यांनी केली.
राष्ट्रीय महामार्गाला तडे जात आहेत. कोट्यावधी निधी खर्च झाला आहे. तर या रस्त्याची अवस्था काय, एकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन पहावे असा प्रश्न मंगेश लोके यांनी उपस्थित केला. शासनाच्या विविध योजनांच्या केवायसी करताना वयोवृद्ध नागरिकांची ससेहोलपट होत आहे. त्यांना तालुक्याच्या ठिकाणी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. प्रत्येक गावात सीएससी सेंटर आहेत. या सेंटरवरतीच केवायसी करण्यात यावी अशा सूचना मंगेश लोके व देवानंद पालांडे यांनी दिल्या.

दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याबद्दल, आंबा काजू नुकसान भरपाई व शेतकरी कर्जमाफी केल्याबद्दल, दशावतार कलाकारांना मानधन दिल्याबद्दल, आरोग्य सेविकांना नोकरीत संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचा अभिनंदन ठराव घेण्यात आला. आदर्श संस्थाचालक पुरस्कार मिळाल्याबद्दल जयेंद्र रावराणे यांचा अभिनंदन ठराव घेण्यात आला. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल महेश संसारे यांचा अभिनंदन ठराव घेण्यात आला.