राजापूर आठवडा बाजारात नियमांचे योग्य पध्दततीने पालन झाले पाहिजे राजापूर तालुका व्यापारी संघाची मागणी नगराध्यक्षांना दिले निवेदन

राजापूर (प्रतिनिधी): शहरात दर गुरूवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून नियमांचे योग्य पध्दतीने पालन झाले पाहिजे. आठवडा बाजार अधिक शिस्तबद्ध, स्वच्छ आणि नागरिकांसाठी सुरक्षित पद्धतीने भरविण्यात यावा अशी मागणी राजापूर तालुका व्यापारी संघाने केली आहे. याबाबतचे एक लेखी निवेदन व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी संघाच्या शिष्टमंडळाच्या वतीने नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांना देण्यात आले आहे.
राजापुरातील आठवडा बाजारातील बेशिस्तपणा, वाहतुक कोंडी, ग्राहकांची होणारी फसवणून यावरून आठवडा बाजार सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. नगर परिषद प्रशासनाने देखील याची दखल घेत आठवडा बाजारात शिस्त लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत आता राजापूर तालुका व्यापारी संघानेही आठवडा बाजारातील बेशिस्तीबाबत नगर परिषद प्रशासनाला लेखी पत्र देत बाजाराला शिस्त लावण्याची मागणी केल आहे.
आठवडा बाजारात नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे अशी मागणी संघाने या निवेदनात केली आहे. आठवडा बाजारात प्रामुख्याने नाशिवंत माल, शेतीमाल आणि शेतीपूरक साहित्याला प्राधान्य देण्यात यावे, अशीही मागणी केली आहे. तसेच विक्रीसाठी येणाऱ्या मालाचा दर्जा चांगला असावा, योग्य वजन-मापाचा वापर करावा, प्लास्टिकचा वापर टाळावा आणि रस्त्याला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने दुकाने लावू नयेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
याशिवाय उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्रीस प्रतिबंध करावा, अशा प्रकारे विक्री करणाऱ्ऱ्यांनी योग्य परवानगी घेणे बंधनकारक करावे, स्थानिक शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र आणि योग्य जागेची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. शहरातील पार्किंग व्यवस्थेचा विचार करून ज्या ठिकाणी आठवडा स्थानिक शेतकरी व व्यापाऱ्यांना बसण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच आठवडा बाजाराच्या दिवशी शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली आहे. गुरुवारी भरणाऱ्या आठवडा बाजाराच्या दिवशी वैशंपायन पूल ते गणेश घाट हा मार्ग पार्किंगसाठी खुला ठेवावा, तसेच गणेश विसर्जन घाट ते नवजीवन हायस्कूल या मार्गावर एकेरी वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणीही व्यापारी संघाने केली आहे.
या निवेदनावर राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या सहया आहेत. याबाबत नगर परिषद नक्कीच योग्य उपायोजना करेले अशी ग्वाही यावेळी नगराध्यक्षा एड. खलिफे यांनी व्यापारी संघाच्या शिष्टमंडळाला दिली.