चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या (MSBTE) वतीने आयोजित स्टेट लेव्हल टेक्निकल क्विझ कॉम्पिटिशन २०२६-२७ या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन सह्याद्री पॉलिटेक्निक, सावर्डे येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग (E&TC) विभागाच्या वतीने दि. ६ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. मुंबई-पुणे विभागातील इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ग्रुपमधील विविध पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
या कार्यक्रमास MSBTE प्रतिनिधी पंकज पोलादे, असिस्टंट प्रोफेसर, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, रत्नागिरी, तसेच अनिरुद्ध शेखर निकम, कार्याध्यक्ष, सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी ज्युरी सदस्य प्रा. इल्तापवार तिरुपती, डॉ. विनोद साळुंखे आणि प्रा. सबिना हुल्लूर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या राज्यस्तरीय स्पर्धेत गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक सह्याद्री पॉलिटेक्निक, सावर्डेच्या विद्यार्थ्यांनी तर तृतीय क्रमांक फादर एंगल पॉलिटेक्निक, वाशी, नवी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी मिळविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सह्याद्री पॉलिटेक्निकचे प्राचार्य मंगेश भोसले यांनी चीफ को-ऑर्डिनेटर तर E&TC विभागाचे विभागप्रमुख रमेश कबाडे को-ऑर्डिनेटर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक ज्ञान, सामान्यज्ञान, संघभावना आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करण्यासाठी अशा राज्यस्तरीय स्पर्धा अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिके डॉ. अश्विनी महाडिक, प्राचार्य, सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.













