अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी केले मार्गदर्शन
लांजा:(प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आज बुधवारी गणेश मंगल कार्यालय, लांजा (आग्रे हॉल) येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यभर विधानसभा मतदारसंघनिहाय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने लांजा येथे शिबिर पार पडले
या शिबीरात अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे हे उपस्थित होते. त्यांनी जमिनी संदर्भात असलेले विविध कायदे या संदर्भात शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केले. विविध शासकीय योजनांची माहिती देताना लोकांनी या सेवा सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके यांनी मार्गदर्शन करताना महसूल विभागाने अशा प्रकारचे शिबिर आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच या शासकीय योजनांचा सर्व शेतकरी लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
या शिबिरात प्रत्येक विभागाचे स्टाॅल लावण्यात आले होते. उपस्थित लोक आणि शेतकऱ्यांनी त्या स्टॉलवर जाऊन त्याच्या विभागाची माहिती घेतली. या कार्यक्रमात दिव्यांगाना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. नासा इस्त्रोसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. बचत गटांना धनादेश वितरण करण्यात आले.
या वेळी व्यासपीठावर मान्यवर अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चालके, तहसीलदार प्रियांका ढोले, लांजा पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, राजापूर सभापती नंदिनी कदम, राजापूर तहसीलदार विकास गंबरे, लांजा राजापूर साखरपा विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू करूप, गटविकास अधिकारी हिंदुराव गिरी, लांजा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, नगरसेवक अन्य राजापूर लांजा तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.












