सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांसाठी पुष्पहार स्पर्धेचे आयोजन

रत्नगिरी :
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. संजना तारी या होत्या, तर कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या शिक्षिका सौ. मानवा रहाटे या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादनाने करण्यात आली. त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुष्पहार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आकर्षक व कल्पकतेने पुष्पहार तयार करून लोकमान्य टिळकांप्रती आदर व्यक्त केला. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलतेला चालना मिळाली तसेच राष्ट्रपुरुषांविषयी आदराची भावना अधिक दृढ झाली.
प्रमुख वक्त्या सौ. मानवा रहाटे यांनी आपल्या मार्गदर्शनात लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी टिळकांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या महान योगदानाची माहिती देत, “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा त्यांचा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांसमोर मांडला. शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक जागृती आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम, 0कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा स्वीकार करून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाला प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. संजना तारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. दिव्यता नागवेकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.