चिपळूण (प्रतिनिधी) : स्व. अजितदादांच्या प्रथम जयंतीनिमित्त सह्याद्री पॉलिटेक्निक, सावर्डे येथे उत्तराखंडमधून आणलेल्या देवदार वृक्षाचे वृक्षारोपण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम आमदार शेखर निकम यांच्या संकल्पनेनुसार आयोजित करण्यात आला.
स्व. अजितदादांनी त्यांच्या दुर्दैवी निधनाच्या सुमारे चार महिने पूर्वी त्यांनी सह्याद्री पॉलिटेक्निकला भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रकल्प व उपकरणांची पाहणी केली होती. आपल्या मिश्किल आणि मनमिळावू स्वभावातून त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले होते. त्यांच्या त्या अविस्मरणीय भेटीच्या स्मृती जपण्यासाठी प्राचार्य मंगेश भोसले यांनी “देवासारख्या माणसासाठी देवदार” या भावनेतून देवदार वृक्षाचे वृक्षारोपण करून त्यांच्या कार्याचा आदर्श कायम स्मरणात ठेवण्याचा संदेश दिला. या उपक्रमासाठी सृष्टीज्ञान संस्थेचे संचालक प्रशांत शिंदे आणि कुणाल अनेराव यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी प्रशांत शिंदे यांनी देवदार वृक्षाचे पर्यावरणीय, औषधी व नैसर्गिक महत्त्व तसेच त्याची वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांना सविस्तरपणे सांगितली. कोकणात प्रथमच देवदार वृक्षाचे वृक्षारोपण होत असल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
अजितदादांच्या स्मृती चिरंतन ठेवण्याबरोबरच पर्यावरण संरक्षण व हरित परिसर निर्मितीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापिका डॉ. लीना जावकर यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगत अधिकाधिक वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यानी उभारलेल्या नक्षत्र गार्डनची पाहणी करण्यात आली. अजितदादांच्या प्रथम जयंतीनिमित्त करण्यात आलेले हे देवदार वृक्षारोपण त्यांच्या स्मृतींना पर्यावरणपूरक, प्रेरणादायी आणि चिरंतन आदरांजली ठरले.













