सावंतवाडी । प्रतिनिधी :
पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सावंतवाडी येथील निसर्गप्रेमी जोवेल डमिंग डिसिल्वा यांना छत्रपती संभाजीनगर येथील पहाट फाऊंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या “सह्याद्रीचे शिलेदार – राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार २०२६” साठी निवड करण्यात आली आहे.
जोवेल डिसिल्वा यांनी पर्यावरण रक्षण आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या बहुमूल्य योगदानाची दखल घेऊन पहाट फाऊंडेशनच्या निवड समितीने या मानाच्या पुरस्कारासाठी त्यांची सर्वानुमते निवड केली आहे. या पुरस्काराचे पत्र पहाट फाऊंडेशनचे संचालक अमोल शामराव भिलंगे यांनी त्यांना पाठवले असून, या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
*जंगली प्राण्यांच्या समस्येवर अभिनव उपक्रम*
सावंतवाडी शहर व लगतच्या ग्रामीण भागात अन्नाच्या शोधात जंगलातून शहरात येणाऱ्या जंगली प्राण्यांमुळे नागरिकांच्या फळझाडांचे, फुलांचे आणि नारळाच्या बागांचे मोठे नुकसान होत होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जोवेल डिसिल्वा यांनी महिन्याभरापूर्वी एक विशेष उपक्रम हाती घेतला. प्राण्यांना जंगलातच पुरेसे खाद्य मिळावे आणि ते शहरात येऊ नयेत, या उद्देशाने त्यांनी जंगलामध्ये विविध फळांच्या बियांचे रोपण केले. भविष्यात या बियांपासून तयार होणाऱ्या झाडांमुळे प्राण्यांची अन्नाची गरज जंगलातच पूर्ण होईल आणि स्थानिक लोकांचे होणारे आर्थिक नुकसान टळेल, या संकल्पनेतून त्यांनी हे कार्य उभारले आहे.
*पालकमंत्र्यांकडून जाहीर कौतुक*
अलीकडेच सावंतवाडी येथे पार पडलेल्या एका शासकीय कार्यक्रमादरम्यान राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी जोवेल डिसिल्वा यांच्या या पर्यावरणपूरक व अभिनव उपक्रमाची दखल घेत त्यांचे जाहीर कौतुक केले होते. तसेच या उपक्रमाला शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले होते.
*८ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे सोहळा*
हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा ८ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. या भव्य कार्यक्रमात जोवेल डिसिल्वा यांना मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जोवेल डिसिल्वा यांच्या या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हाभरातून आणि सामाजिक व पर्यावरण क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










