धोकादायक जागी होत असलेल्या तपासणीमुळे वाहनधारकांमध्ये तीव्र संताप; अपघाताचा मोठा धोका
देवरूख (प्रतिनिधी):
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या आंबा घाटात सध्या पोलिसांकडून सुरू असलेल्या वाहन तपासणीमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.नागमोडी वळणे आणि तीव्र उतरावासाठी ओळखल्या जाणाऱ्या या घाटाच्या अगदी मध्यभागी पोलीस पथकांकडून वाहने अडवली जात असून, कागदपत्रांच्या तपासणीच्या नावाखाली भर घाटात ही असुरक्षित नाकाबंदी केली जात आहे. तीव्र चढ-उतारांवर आणि धोकादायक वळणांवर वाहने अचानक थांबवावी लागत असल्यामुळे ब्रेक फेल होणे, गाड्या मागे घसरणे किंवा पाठीमागून धडक बसणे यांसारख्या गंभीर अपघातांचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
सध्या कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असताना, घाटातच प्रवाशांची अशी नाहक अडवणूक होत असल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अरुंद रस्त्यावर गाड्या थांबवल्यामुळे दोन्ही बाजूंना किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी होत असून प्रवाशांचा वेळ वाया जात आहे. नियम असे सांगतात की कागदपत्र तपासणी नेहमी मोकळ्या आणि सपाट रस्त्यावर केली जावी, मात्र आंबा घाटातील या बेजबाबदार प्रकारामुळे प्रशासनाला सुरक्षेचे काही देणेघेणे आहे का, असा सवाल संतप्त वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.
भर घाटात, जिथे रस्त्याच्या एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर आहे, अशा ठिकाणी वाहने थांबवून तपासणी करणे अत्यंत अयोग्य, बेजबाबदार आणि नियमबाह्य आहे.
एखादा मोठा अपघात घडल्यावरच पोलीस प्रशासन आणि संबंधित विभाग जागा होणार का? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन आंबा घाटातील ही धोकादायक तपासणी त्वरित बंद करावी, अन्यथा या ठिकाणी अपघात झाल्यास त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा संतप्त वाहनधारकांनी दिला आहे.












