मंडणगड/रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड शहरातील दापोली फाटा येथे खाजगी वाहतूकदारांच्या दोन संघटनांमधील वादाने तीव्र स्वरूप धारण केले आहे. वलजाई ट्रॅव्हल्स आणि गौरीशंकर ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बस अडवण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. रात्री उशिरापर्यंत बस जागेवरच उभ्या राहिल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, वाहतूकदारांमधील वादात सामान्य प्रवाशांना वेठीस धरणे थांबवून तातडीने तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.













